
फन लीडर्स फाऊंडेशन व प्रबोधन गोरेगाव आयोजित ‘कवितांगण’चा शंभरावा कार्यक्रम रविवारी गोरेगावच्या प्रबोधन क्रीडा भवन येथे उत्साहात पार पडला. यावेळी 93 कवींनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या. 2003 पासून कवितांगणच्या माध्यमातून नवोदित कवींची काव्यप्रतिभा बहरत आहे.
‘कवितांगण’ हे कवी तसेच साहित्य रसिकांसाठी मुक्त व्यासपीठ असून कवींनी कवींसाठी आयोजित केलेले द्वैमासिक काव्य संमेलन आहे. या कार्यक्रमाची संकल्पना अ. वि. साळवी यांची आहे. ‘कवितांगण’च्या शंभराव्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईशान संगमनेरकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गौरी गाडेकर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आयपीएस अधिकारी रवींद्र शिसवे यांनी समाजात मूल्य रुजविण्यातील लेखकाचे योगदान अधोरेखित केले. कवी कसा घडतो हे प्रसाद कुलकर्णी यांनी कवितेतूनच उलगडून सांगितले. यावेळी वैदू समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करण्यासाठी अविरत कार्यरत असणाऱया दुर्गा गोडेलू तसेच आरती साळवी यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन सलोनी बोरकर यांनी केले. प्रबोधन, गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे, खजिनदार रमेश इस्वलकर यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. कार्यक्रमासाठी ‘कवितांगण’ च्या प्रभाकर करपे, गीतांजली दळवी, मीरा सावंत, पूजा काळे, अश्विनी स्वर्ण, विवेकानंद मराठे, नंदू सावंत, कविता झुंजारराव, अनू इंगळे आणि डॉ. शुभम पाटील आदींनी परिश्रम घेतले. आयोजक पंकज दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.