Spy Scandal : आणखी एक युट्यूबर रडारवर, पाकिस्तान दौऱ्याबाबत यंत्रणांकडून सखोल तपास सुरू
esakal May 20, 2025 11:45 AM

भुवनेश्वर : ओडिशातील पुरी जिल्ह्यातील महिला ट्रॅव्हल व्ल्होगर प्रियांका सेनापती तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पोलिसांनी व्ल्होगर ज्योती मल्होत्राला नुकतेच ताब्यात घेतले असून, तिच्याशी प्रियांकाच्या असलेल्या कथित संबंधांचा तपास केला जात आहे. प्रियांकाच्या युट्यूब चॅनेलचे १४ हजार ६०० सबस्क्राइबर असून इन्स्टाग्रामवर तिचे वीस हजार फॉलोअर्स आहेत.

प्रियांका ही नुकतीच पाकिस्तान दौऱ्यावर जाऊन आली आहे. तिचा याबाबतचा एक व्हिडिओ युट्यूबवर असून, त्यामुळे प्रियांका तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. प्रियांकाही देखील ज्योती मल्होत्राप्रमाणे करतारपूर कॉरिडोरला गेली होती. त्यामुळे प्रियांका केवळ करतारपूर येथेच गेली होती की ज्योती मल्होत्राप्रमाणे तीने अन्यत्र कोठे प्रवास केला आहे का? याचा तपास केला जात आहे. तपासात उपलब्ध झालेले व्हिडिओ आणि छायाचित्रे या आधारे ज्योती आणि प्रियांका यां दोघींमध्ये अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षी ज्योती पुरी येथे गेली असता ती प्रियांकाने तिची पुरी येथील निवासाची सर्व व्यवस्था केल्याचे समजते आहे.

अकाउंटवर लक्ष

तपास यंत्रणांकडून प्रियांकाच्या समाज माध्यमातील सर्व अकाउंटवर लक्ष ठेवले जात असून, तिची आणि तिच्या कुटुंबीयांचीदेखील चौकशी करण्यात येत आहे. प्रियांका प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हेरगिरीमध्ये सहभागी झाली आहे का याबाबतही तपास केला जात आहे.

‘आमच्यात केवळ मैत्री’

प्रियांकाने मात्र ज्योती मल्होत्राशी केवळ मैत्री असल्याचा दावा केला आहे. ‘‘माझे आणि ज्योतीचे आवडीचे विषय आणि क्षेत्र समान असल्याने आमच्यात मैत्री झाली,’’ असे प्रियांकाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, तपास पूर्ण होईपर्यंत ज्योतीला पुरी सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

आसाममध्ये आतापर्यंत ७१ जण अटकेत

गुवाहाटी : आॅपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून देशविरोधी कृत्यांमध्ये घेणाऱ्या तब्बल ७१ जणांना आसाम सरकारने अटक केल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून सोमवारीaदिली दिली. कोक्राझारस, गोवालपारा आणि दक्षिण सलमारामानकाचार जिल्ह्यातील तिघांना देशविरोधी कृत्यांमध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून आतापर्यंत याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या ७१ झाली आहे, अशी माहिती सरमा यांनी दिली. आसाम पोलिस हे समाजमाध्यमांवरही करडी नजर ठेऊन असल्याचेही सरमा यांनी सांगितले.

पाकच्या घोषणा देणाऱ्यांना अटक

आग्रा : पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील शहागंज परिसरातील काही जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. यापैकी दोघांची ओळख पटली असून, गोपाळ चहर आणि अर्जुन गिरी अशी त्यांची नावे आहेत. काँग्रेसचे स्थानिक नेते अपूर्व शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शर्मा यांनी सांगितले की, शहागंज परिसरात नुकतीच तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेचा एक व्हिडिओ समाज माध्यमांत प्रसारित झाला होता. या व्हिडिओमध्ये काही जण पाकसमर्थनार्थ घोषणा देत असल्याचे लक्षात आल्यानंतर मी पोलिसांत तक्रार दाखल केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.