नवी दिल्ली : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांची माफी स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. ‘मंत्री शहा यांनी मागितलेली माफी म्हणजे नक्राश्रू आहेत,’ असे सांगतानाच या प्रकरणाच्या तपासासाठी राज्याबाहेरील तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश न्या. सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिले आहेत.
‘विजय शहा यांच्यावर झालेल्या आरोपांची वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. तीनही आयपीएस अधिकारी राज्याबाहेरचे असतील तसेच त्यांचा दर्जा जिल्हा पोलिस प्रमुख अथवा त्याच्या वरचा असेल. पोलिस महासंचालक या पथकाचे नेतृत्व करतील तसेच या पथकात एका महिला आयपीएस अधिकाऱ्याचाही समावेश असेल,’ असे न्या. सूर्यकांत यांनी म्हटले आहे. ‘याचिकाकर्त्यानेही तपासात सामील होत पूर्ण सहकार्य करावे,’ असे सांगतानाच शहा यांच्या अटकेला खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ मे रोजी होणार आहे.
नेत्याने जबाबदारीने वागावेशहा यांची बाजू मांडणारे वकील मनिंदरसिंग म्हणाले की ‘त्या’ विधानाबद्दल आपले अशील माफी मागत आहेत. यावर न्या. सूर्यकांत यांनी ‘‘ आम्हाला तुमची माफी नको आहे. कायद्यानुसार आम्ही हे प्रकरण हाताळू. दुसऱ्यांदा जर माफी मागितली तर तो न्यायालयाचा अवमान समजला जाईल. तुमचे अशील हे नेते आहेत. नेत्याने संवेदनशील असले पाहिजे आणि जबाबदारीने वागले पाहिले. आम्हाला लष्करावर गर्व आहे. कोणत्या वेळी काय बोलावयास हवे, याची जाणीव नेत्याला असावयास हवी होती,’’ अशा शब्दांत ताशेरे ओढले.
माफीत काही अर्थ आहे काय?‘‘तुम्ही कसली माफी मागत आहात, त्यात खरोखरच काही अर्थ आहे का, बहुसंख्य मंडळी ही कायदेशीर प्रक्रियेतून पळवाट काढण्यासाठी अशा प्रकारची सौम्य भाषा वापरतात अथवा बऱ्याचदा त्यांच्या डोळ्यात मगरीचे अश्रू पाहायला मिळतात. तुमचा माफीनामा यापैकी काय आहे, या प्रकरणामध्ये प्रामाणिकपणे माफी मागायला तुम्हाला कोणी रोखले होते,’’ असे न्या. सूर्यकांत यांनी म्हटले आहे.