सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 दिवसांत 10 तोळं 48,300 रुपयांनी घसरलं, नेमकी काय सांगते आकडेवारी?
Marathi May 20, 2025 03:25 PM

सोन्याचे दर: सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. युद्धाचे ढग निवळताच सोन्याच्या दरात आता हळू हळू घसरण होत असल्याचे चित्र आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या शक्यतेमुळे देशातील आर्थिक विश्वावर असलेली अस्थिरतेची टांगती तलवार काही अंशी तरी का होईना दूर होताना दिसत आहे. अशातच भारतीय भांडवली बाजार आणि वायदे बाजारात याचे सकारात्मक पडसाद उमटताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Price) सातत्याने घसरण होताना दिसत आहे. अशातच आता गेल्या 10 दिवसांत 10 तोळं  सोन्याच्या दरात तब्बल 48,300 रुपयांनी घसरण झाली आहे.

10 तोळे सोन्याच्या दरात साधारणता 48,300 रुपयांनी घसरण

पुढे आलेल्या माहितीनुसार 8 मे ते 18 मे या दहा दिवसांच्या कालावधीत 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 99, 600 रुपयांवरून 95,130 रुपयांवर आले आहे. परिणामी, 10 तोळे सोन्याच्या दरात साधारणता 48,300 रुपयांनी घसरण झाली आहे. सोमवार (दिनांक 19 मे 2025) रोजी सोन्याच्या दरात वाढ जालीय. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 87200 रुपये होता, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 95 130 रुपयांना आहे. तर मुंबईत चांदीचा भाव 100 रुपयांनी घसरून 96900 रुपये प्रति किलो इतका  होता. मात्र एकंदरीत गेल्या 10 दिवसांचा विचार केला तर सोन्याचे दर आता हळूहळू कमी होत असल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे, 12 ते 16 मे दरम्यान, 24 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 35,500 रुपयांची आणि 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 3,500 रुपयांची घसरण झाली आहे. पुढील ट्रेडिंग सत्रात, सोने आणि चांदी अनुक्रमे 88000-95000 आणि 91,000-98,000  च्या वर ट्रेड करू शकतात.

नेमकी काय सांगते आकडेवाडी?

गुड रिटर्न्सच्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. सोन्याच्या किमतीत 3.5 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, तर चांदीच्या किमतीत 1 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. जागतिक व्यापार तणाव कमी झाल्यामुळे आणि गुंतवणूकदारांमध्ये चांगली भावना निर्माण झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत ही घसरण झाली आहे, ज्यामुळे सुरक्षित मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धात 90  दिवसांचा ब्रेक लागल्याने सोन्याच्या किमती घसरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.दोन्ही देशांमधील या करारात अमेरिकेने चिनी वस्तूंवरील शुल्क 145 टक्क्यांवरून 30 टक्के केले आहे. तर चीनने अमेरिकन आयातीवरील कर 125  टक्क्यांवरून 10 टक्के केला आहे. हे पाऊल व्यापार युद्ध कमी करण्यासाठी दोन्ही देशांमधील परस्पर कराराचे प्रतिबिंब आहे. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करारामुळेही सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती. तर , रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.