दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात औपचारिक सामना सुरु आहे. या सामन्यात जय पराजयापेक्षा सन्मान महत्त्वाचा असणार आहे. कारण दोन्ही संघ तळाशी आहेत. त्यात राजस्थानचा या स्पर्धेतील शेवटचा सामना असल्याने शेवट गोड करण्याचा प्रयत्न आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामना सुरु झाला आणि मैदानात चर्चेला उधाण आलं. महेंद्रसिंह धोनी प्रेक्षकांमध्ये बसला असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येक जण महेंद्रसिंह धोनीच्या बाजूला बसण्यासाठी धडपड करू लागला. पण हा खराखुरा महेंद्रसिंह धोनी नसून त्याचासारखा दिसणारा फॅन आहे. त्यामुळे चाहते काही काळ संभ्रमात पडले होते. बराच काळ चाहत्यांनी त्याला गराडा घातला. मग कळलं की हा खरा धोनी नसून त्याच्यासारखा दिसणारा त्याचाच चाहता आहे. धोनीच्या डुप्लिकेटचं नाव ऋषभ मालाकार आहे.
ऋषभ मालाकार हा हुबेहूब महेंद्रसिंह धोनीसारखा दिसतो. स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत आला आहे. त्यामुळे त्याचा आणि धोनीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी धोनीचा क्लोन म्हणून त्याचा उल्लेख केला आहे. इतकंच काय तर काही चाहत्यांनी त्याला पाहून धोनी-धोनीच्या घोषणाही दिल्या. ऋषभ मालाकार हा मध्यप्रदेशच्या इंदुरमधला रहिवासी आहे. त्याला इंदुरमध्येही सर्वजण माही म्हणून हाक मारतात. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॅन्स आहेत. धोनीचा डुप्लिकेट असल्याने त्याला बराच फायदा झाला आहे. यामुळे त्याला पैसे कमवण्याची संधीही मिळाली आहे. मागच्या वर्षी ऋषभ इंडियन वेटरन प्रीमियर लीग स्पर्धेतही दिसला होता. त्याला लीग आयोजकांनी बोलवलं होतं. तेव्हा खूपच व्हायरल झाला होता.
महेंद्रसिंह धोनीने राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात काही खास करू शकला नाही. त्याने 17 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 16 धावा केल्या. आकाश मढवालच्या गोलंदाजीवर बाद झाला. दरम्यान, त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स यंदा काही खास करू शकली नाही. त्यामुळे पुढच्या पर्वात खेळणार की नाही असा प्रश्न आहे. अनेकांनी त्याचं हे आयपीएलचं शेवटचं पर्व असेल असं गृहीत धरलं आहे. मात्र याबाबत अधिकृत अशी कुठेच काहीच माहिती नाही.