सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये तीन हजार दोन शाळा होत्या आणि त्या शाळांवर ११ हजार २९२ शिक्षक कार्यरत होते. त्यावेळी खासगी विशेषत: स्वयंअर्थसहाय्यित इंग्रजी शाळांची संख्या कमीच होती. पण, दहा वर्षांत गावागावांत इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या आणि पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या सुमारे २२८ शाळांना कुलूप लावावे लागले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एक हजार ९९२ शिक्षक कमी झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
२०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षातील शाळा १६ जूनपासून सुरू होतील, तत्पूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांवरील चार हजार ६०० शिक्षकांच्या दुसऱ्या शाळांवर बदल्या होतील. त्यासाठी कोणत्या तालुक्यातील किती शाळांमध्ये पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक नाहीत, कोणत्या शाळांमध्ये समानीकरणामुळे शिक्षक कमी आहेत, याची माहिती २२ मेपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविली आहे. त्यानंतर १४ जूनपूर्वी त्या शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. यंदाच्या संचमान्यतेत पटसंख्येअभावी पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ५६६ शिक्षकांची पदे कमी झाली आहेत. घटत चाललेल्या पटसंख्येला आवर घालण्यासाठी आता गुणवत्तेवर भर दिला जाणार असून शिक्षकांना देखील सुमारे साडेनऊ हजार पटसंख्या वाढीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
पटसंख्या कमी होऊ नये म्हणून गुणवत्तेवर फोकस
जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे. गुणवत्ता टिकून राहिल्यास निश्चितपणे पटसंख्या कमी होत नाही, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पटसंख्या टिकली तर शिक्षकांची संख्या कमी होणार नाही.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती
२०१४-१५ मधील शाळा
३,००२
मंजूर शिक्षकांची संख्या
११,२९२
२०२४-२५ मधील शाळा
२,७६४
एकूण शिक्षक
९,३००
१० वर्षांत घटलेले शिक्षक
१,९९२
शिक्षक भरतीत झेडपीचे एकही पद नाही
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. २०२४-२५ च्या संचमान्यतेत देखील पुन्हा ५६६ शिक्षक कमी झाले आहेत. शासन निर्णयानुसार रिक्त पदांच्या ८० टक्के पदभरतीस मान्यता आहे. पण, सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षकांची ९५ टक्क्यांपर्यंत पदे भरलेली दिसतात. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला एकही नवीन शिक्षक मिळणार नाही, अशी स्थिती असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.