आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी याने 18 व्या मोसमात आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. वैभवने पदार्पणातील हंगामात वेगवान शतक ठोकलं. वैभव आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. मात्र आता वैभव दुसर्याच एका कारणामुळे चर्चेत आला आहे. वैभव आणि पंजाब किंग्स टीमची मालकीण अभिनेत्री प्रिती झिंटा या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोत वैभव आणि प्रीत झिंटा एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. मात्र या व्हायरल फोटोमागील सत्य वेगळं आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमात 17 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यानंतर प्रीती झिंटा आणि या युवा खेळाडूची भेट झाली. या दरम्यान दोघांनी हस्तांदोलन केलं. मात्र काही नेटकऱ्यांनी खोडसाळपणा केला. प्रीती झिंटा आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याचा फेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर प्रीती झिंटा हीने एक्स या सोशल मीडिया प्लटफॉर्मवरुन पोस्ट करत संताप व्यक्त केला.
मुळात प्रीती झिंटा आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी एकमेकांना मिठी मारलीच नव्हती. या दोघांमध्ये सामन्यानंतर चर्चा झाली. या दरम्यान दोघांनी हस्तांदोलन केलं. मात्र नेटकऱ्यांनी या दोघांनी मिठी मारल्याचा फोटो सोशल मीडियावर पसरवला. या फेक फोटो काही जणांना खराही वाटला.नेटकऱ्यांनी सत्यता न पडताळता फोटो व्हायरल केला.
प्रीती झिंटा फेक फोटोवरुन संतापली
“हा एक मॉर्फ केलेला फोटो आहे. मला खूप आश्चर्य वाटतं की आता वृत्तवाहिन्या देखील मॉर्फ केलेल्या प्रतिमा वापरत आहेत आणि त्यांना बातम्या म्हणून दाखवत आहेत!”, असं म्हणत प्रीती झिंटा हीने हा फोटो खोटा असल्याचं स्पष्ट केलं आणि खोट्या बातम्या दाखवणाऱ्या माध्यमांवर संताप व्यक्त केला.
दरम्यान वैभव सूर्यवंशी याने या 18 व्या मोसमातील 6 सामन्यांमध्ये 32.50 च्या सरासरीने आणि 219.10 या स्ट्राईक रेटने 195 धावा केल्या आहेत. वैभवने या 14 सामन्यांमध्ये 14 षटकार आणि 20 चौकार लगावले आहेत. वैभवची 101 ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.