आयपीएल 2025 स्पर्धेतील 61 सामन्यांचा खेळ आता संपला आहे. या स्पर्धेत तीन सामन्यांचा खेळ होऊ शकला नाही. एका सामन्यामुळे तर केकेआरचं प्लेऑफचं गणित चुकलं. त्यामुळे स्पर्धेबाहेर जाण्याची वेळी आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स या तीन संघांनी प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. तर चौथ्या संघासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरस आहे. पावसाचा अंदाज बांधून बीसीसीआयने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हा सामना बंगळुरूतून लखनौच्या इकाना मैदानात शिफ्ट केला आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने उर्वरित सामन्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पावसाची शक्यता पाहाता एक नवा नियम आणि अतिरिक्त व्यवस्था लागू केली आहे. यामुळे सामना निष्पक्ष आणि रोमांचक होण्यास मदत होईल.
बीसीसीआयने आयपीएल सामन्यांसाठी ठरलेल्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त वेळेत आणखी एका तासाची भर घातली आहे. 20 मेपासून होणाऱ्या सर्व सामन्यांसाठी 120 मिनिंटांचा अतिरिक्त वेळ असणार आहे. यापूर्वी हा वेळ फक्त एक तासांचा होता. बीसीसीआयने माहिती देताना सांगितलं की, स्थितीचा आढावा घेऊन नियमात बदल केला असून तात्काळ लागू केला आहे. बीसीसीआयने सर्व संघांना याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने स्पष्ट केलं की, ‘प्लेऑफ टप्प्याप्रमाणे, मंगळवार, २० मे पासून सुरू होणाऱ्या लीग टप्प्यातील उर्वरित सामन्यांसाठी खेळण्याच्या परिस्थितीसाठी अतिरिक्त एक तास दिला जाईल.’
भारत पाकिस्तान तणावपूर्ण स्थितीमुळे आयपीएल स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित केली होती. परिस्थिती निवळल्यानंतर 12 मे रोजी नवं वेळापत्रक जाहीर केलं गेलं. या वेळापत्रकानुसार 17 मे पासून स्पर्धा सुरु झाली आणि अंतिम सामना 3 जूनला होणार आहे. पण प्लेऑफच्या सामन्यांचं मैदान काही ठरवलं नव्हतं. आता आयपीएल स्पर्धेचा अंतिम आणि क्वालिफायर 2 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. तर एलिमिनेटर आणि क्वालिफायर 1 सामना मुल्लांपूरच्या महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.