छत्रपती संभाजीनगर : टोल आणि रिअल इस्टेट व्यवसायात गुंतवणुकीवर दोन ते आठ टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना तब्बल दोन कोटी ३० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. जानेवारी २०२२ ते मे २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
या प्रकरणातील मुख्य संशयित विजय केशवराव धायडे आणि त्याची पत्नी प्रियांका विजय धायडे (रा. ब्लू बेल्स, हरे रामा हरे कृष्णा हाउसिंग सोसायटी, चिकलठाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. हे दांपत्य ‘घई कंस्ट्रक्शन्स इंजिनिअर्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स’ आणि ‘श्री गणेश लेबर सप्लायर्स ॲण्ड सर्व्हिसेस’ या फर्मच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी मंगेश सतीश म्हात्रे (वय ३६, रा. भईंदर, जि. ठाणे) यांनी तक्रार दिली. म्हात्रे यांचा ठाणे येथे हॉटेलचा व्यवसाय आहे. यामध्ये त्यांचे मित्र विशाल घुगे यांच्या माध्यमातून विजय धायडे याच्याशी झाली. धायडे याने त्याच्या व्यवसायातील प्रगती, एमएसआरडीसी आणि टोल कलेक्शन यंत्रणांतील व्यवहार सांगून म्हात्रेंचा विश्वास संपादन केला.
करारनामे, बिले, चेक्स आणि मालमत्ता कागदपत्रे पाहून फिर्यादीचा विश्वास बसला. धायडे याने म्हात्रे यांना आमिष दाखवले, की सध्या त्यांना व्यवसाय वाढविण्यासाठी गुंतवणुकीची आवश्यकता आहे. त्यावर दोन ते आठ टक्के मासिक व्याज दिले जाईल. या प्रलोभनाला भुलून म्हात्रे यांनी जानेवारी २०२२ पासून एकूण एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणुकीनंतर सुरवातीच्या काही महिन्यांमध्ये म्हात्रेंना काही प्रमाणात परतावा मिळाला.
यामुळे त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. मात्र, पुढे धायडे दांपत्याने आणखी पैसे मागून घेतले. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी सांगितले, की एमएसआरडीसीकडून १३ कोटी रुपयांचे बिल मिळणार असून, काहीच दिवसांत मोठा परतावा दिला जाईल. यासाठी त्यांनी म्हात्रेंकडून आणखी २५ लाख रुपये घेतले. पण, त्यानंतर त्यांचा संपर्क कमी झाला. फोन न उचलणे, भेट टाळणे अशा प्रकारांना सुरवात झाली. जेव्हा म्हात्रे यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन पैसे मागितले, तेव्हा धायडेने म्हात्रे यांनाच धमकावले.
या गुंतवणूकदारांची केली फसवणूकया प्रकरणात विशाल घुगे ५० लाख, त्यांची पत्नी कीर्ती घुगे ५० लाख तसेच रश्मी वाडे यांचे ३० लाख अशी एक कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले. यापैकी काही जणांनी सुरवातीस परतावा मिळाल्यामुळे आपल्या नातेवाइकांनाही गुंतवणुकीस प्रवृत्त केले होते. परंतु, आता सर्वांच्या रकमा अडकलेल्या आहेत. सिडको पोलिस ठाण्यात विजय व प्रियांका धायडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची व्याप्ती पाहता गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पुढील तपास पीएसआय चंद्रकांत कामठे करीत आहेत.