भारत पाकिस्तान तणावपूर्ण स्थितीत आयपीएलचं वेळापत्रक बदलण्याची वेळ आली होती. एका आठवड्याच्या स्थगितीनंतर 17 मे पासून पुन्हा सामन्यांना सुरुवात झाली. आता ही स्पर्धा 3 जूनपर्यंत असणार आहे. पण नव्या वेळापत्रकात आता आणखी एक बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना 23 मे रोजी बंगळुरुत खेळला जाणार होता. मात्र आता हा सामना आता लखनौच्या इकान स्टेडियममध्ये शिफ्ट केला गेला आहे. बीसीसीआयने पावसाचा अंदाज घेऊन हा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या दोन ते तीन दिवसात दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हा सामना होणं कठीण दिसत आहे. यामुळे आयोजनकांनी हा सामना शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या या निर्णयामुळे आरसीबी उरलेले दोन्ही सामने घराबाहेर खेळणार आहे. 23 मे रोजी आरसीबीचा सामना हैदराबादशी होणार आहे. तर 27 मे रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामना खेळणार आहे. म्हणजेच बंगळुरुत आता एकही सामना होणार नाही.
आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. याचा थेट फटका कोलकाता नाईट रायडर्सला बसला होता. कारण हा सामना रद्द झाल्याने प्लेऑफच्या शर्यतीतून नाव बाद झालं. तर आरसीबीला एका गुणामुळे प्लेऑफचं मार्ग मोकळा झाला. आता बंगळुरुत 23 मे रोजीही पावसाची शक्यता आहे. यामुळे हा सामना शिफ्ट करण्यात आला आहे. हा सामना शिफ्ट केल्याने आरसीबीला फायदा होऊ शकतो. कारण उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर टॉप दोन मधील स्थान पक्कं होईल.
दरम्यान, आयपीएलने प्लेऑफ आणि अंतिम फेरीसाठीही शेड्युल जाहीर केलं आहे. या वेळपत्रकानुसार क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना पंजाबच्या मुल्लांपूरमध्ये होणार आहे. तर क्वालिफायर 2 आणि फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. प्लेऑफमध्ये आरसीबीसोबत पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्सने जागा मिळवली आहे. तर चौथ्या जागेसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चुरस आहे.