अंबरनाथ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये एका चायनीज हॉटेलचालकाला लोखंडी रॉड, दगड, तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. अंबरनाथ पश्चिमेला भास्कर नगरमध्ये उमेश प्रकाश गागुंर्डे यांचे चायनीज खाद्यपदार्थांचे दुकान आहे. या दुकानात लावलेल्या चिमणी काढण्याच्या कारणावरून रविवारी (ता. १८) मध्यरात्री वाद झाला. या वादातून उमेश गागुंर्डे आणि त्यांचा भाऊ चंद्रकांत यांना राकेश गुप्ता (वय ४०), संतोष लष्कर (वय ३८), राकेशचा भाऊ (वय ३६), प्रकाश म्हात्रे (वय ३२), आकाश जगले (वय ३०) यांच्यासह आणखी सात ते आठ साथीदारांनी लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल आहे.