सध्या आयपीएलचा 18 हंगाम सुरू आहे. हा हंगाम आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. तत्पूर्वी आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला (CSK) यावेळी आयपीएलच्या प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे एसएस धोनीबद्दल (MS Dhoni) प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अनेकांना वाटते की हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम होता आणि तो लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकतो. त्यावर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी यावर एक विधान केले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आज (20 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळत आहे, दोन्ही संघ आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत परंतु आजही धोनीला पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरलेले दिसते. राजस्थान विरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत, जेव्हा सीएसके प्रशिक्षकांना धोनीच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, “मला माहित नाही.” आयपीएल 2025 पूर्वी धोनीला 4 कोटी रुपयांना संघात कायम ठेवण्यात आले होते, त्याचा करार 3 वर्षांचा होता. पण, धोनी याआधीही निवृत्तीची घोषणा करू शकतो.
आयपीएल 2025 मध्ये, चेन्नई सुपर किंग्जचे अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले होते, त्यामुळे त्यांना अनेक तरुण खेळाडूंना बदली खेळाडू म्हणून करारबद्ध करावे लागले. 17 वर्षीय आयुष म्हात्रे, 22 वर्षीय डेवाल्ड ब्रेव्हिस आणि 26 वर्षीय उर्विल पटेल सारख्या तरुण खेळाडूंना बदली खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आणि आतापर्यंत खेळलेल्या काही सामन्यांमध्ये त्यांनी प्रभावित केले आहे. फ्लेमिंग म्हणाले की तो अनुभवी खेळाडूंचा चाहता आहे, परंतु तो तरुण खेळाडूंना संघात आणू इच्छितो.
फ्लेमिंग पत्रकार परिषदेत म्हणाले, “निश्चितच त्यांचा प्रभाव सकारात्मक राहिला आहे, कारण हा हंगाम आव्हानात्मक होता. परंतु आम्हाला लवकरच लक्षात आले की आम्ही गतीच्या मागे आहोत. म्हणून या खेळाडूंना समाविष्ट करणे भविष्यासाठी निश्चितच योग्य आहे, कारण आम्ही संघ पुन्हा तयार करत आहोत आणि आमच्या खेळण्याच्या पद्धतीचे तत्वज्ञान पुन्हा विकसित करत आहोत.”
फ्लेमिंग पुढे म्हणाले, “मला वाटते की तरुणाई आणि अनुभवाचे मिश्रण असले पाहिजे. मी अनुभवाचा चाहता आहे, स्पर्धा अनुभवाने जिंकल्या जातात. परंतु या देशात तरुणाई आणि प्रतिभा ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही.”