बीच व्हॉलीबॉलमध्ये विजयी सलामी, दीव दमण संघाचा धुव्वा,
पेंचक सिलट प्रकारात दोन कांस्यपदके
दीव ः युवा स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक केल्यानंतर आता पहिल्या खेलो इंडिया बीच स्पर्धेतही महाराष्ट्र संघाने शानदार कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पांरपारिक खेळ पेंचक सिलट प्रकारात महाराष्ट्राने दोन कांस्यपदकांची कमाई केली. शिवाय बीच व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने यजमान दीवचा ४२-१२ गुणांनी धुव्वा उडवला.
प्रथमच होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचे ७८ खेळाडू सहभागी झाले आहेत. यात ४८ पुरूष¨व ३० महिला खेळाडूंचा समावेश आहे. पहिल्या स्पर्धेत बीचसॉकर, बीच कबड्डी, बीच व्हॉलीबॉल, बीच सेपक टकरा, बीच पेंचक सिलट, सागरी जलतरण व रस्सीखेच हे क्रीडाप्रकार रंगणार आहेत. क्रीडा उपसंचालक नवनाथ फडतरे हे महाराष्ट्राचे संघाचे पथकप्रमुख आहेत.
दीवच्या घोघला समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या बीच व्हॉलीबॉलच्या सलामीच्या लढतीत महाराष्ट्राच्या महिला संघाने यजमान दीववर दणदणीत विजय संपादन केला. पहिल्या मिनिटापासून महाराष्ट्राच्या महिलांनी आक्रमक खेळ करीत पहिल्या सेटमध्ये २१-१ गुणांची आघाडी घेतली होती. हीच आघाडी दुसऱ्या सेटमध्ये कायम राखून मृणाल अगरकर आणि रूही मोरे यांच्या संघाने ४२-१२ गुणांनी २-० सेटने महाराष्ट्रासाठी विजयी वाटचाल सुरू केली. बीच सेपक टकरा स्पर्धेतील सलामीच्या लढीतीत दिल्लीकडून महाराष्ट्रला पराभव स्वीकारावा लागला. दोन सेटमध्ये दिल्ली विजयी ठरली. राजस्थान, तामिळनाडू हे संघ महाराष्ट्राच्या गटात आहेत.
पारंपारिक पेंचक सिलट प्रकारात २ कांस्य पदके जिंकून महाराष्ट्राच्या पदकाचे खाते उघडले. वैयक्तिक प्रकारात मुंबईच्या वैभव काळेने ५४१ गुणांनी कमाई करीत कांस्य पदक जिंकले. पंजाबच्या आर्यन सिंगने ५६० गुणांसह तर ओरिसाच्या सोहिल गुरूंगने ५४२ गुणांसह रौप्यपदक पटकावले. तुंग्गल प्रकारात लातूरच्या कृष्णा पांचाळ हीनेही कांस्यपदकाचे यश संपादन केले. कलात्मक प्रदर्शन करीत कृष्णाने राष्ट्रीय पातळीवर पदक जिंकण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. यजमान दादरा-हवेली, दमन आणि दीव संघाच्या प्रसन्न बेंद्रेने सुवर्णपदक पटकावले.