खराब रस्त्यांच्या
दुरुस्तीचे आश्वासन
गुहागरः गुहागर ते शासकीय विश्रामगृह तिसरे वाकणपर्यंतच्या खराब रस्त्याबाबत गेले दोन महिने गुहागरप्रेमी नागरिकांच्यावतीने स्थानिक प्रशासन, गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग कार्यालय चिपळूण येथे सातत्याने पाठपुरावा केला होता. याबाबत निवेदन देण्यात आले होते. या प्रकरणी तहसीलदारांनी लोकशाही दिनात महामार्ग अधिकारी यांना बोलावून घेतले. आजच्या लोकशाहीदिनात याबाबत चर्चा झाली. सक्षम अधिकारी शाम खुचेकर यांनी २४ मे च्या आत या खराब रस्त्याबाबत काम सुरू करण्यात येईल, असे नागरिकांना ठोस आश्वासन दिले. लोकशाही दिनाला पदाधिकारी अनिल शिंदे, विश्वनाथ रहाटे, अरूण भुवड, विनोद जनावलकर, नामदेव अवेरे, पराग कांबळे, अभिजित रायकर आदी उपस्थित होते.
------
बापेरेतील क्रिकेट स्पर्धेत
सम्राट संघाची बाजी
लांजाः तालुक्यातील बापेरे येथील पंचशील सेवा संघ व उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सम्राट ई-लेव्हल इसवली संघाने बाजी मारली. अचलेश्वर रूण संघाने उपविजेतेपद पटकावले. विजेत्यांना २५ हजार रुपये आणि चषक प्रदान करण्यात आला. तालुक्यातून २२ संघांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.
------
माजी सैनिक संवर्गातून
विविध पदांसाठी भरती
रत्नागिरी : बाह्ययंत्रणेद्वारे माजी सैनिक संवर्गातून विशेष निधीतून अशासकीय कर्मचारी भरती करण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे १० जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. सैनिकी मुलामुलींचे वसतीगृह, चिपळूण व विश्रामगृह चिपळूण, माजी सैनिक विश्रामगृह खेड व दापोली व सैनिकी मुलांचे वसतीगृह, देवरूख येथे सहाय्यक वसतीगृह अधीक्षक, सहाय्यक वसतीगृह अधिक्षिका प्रत्येकी १ पद, पहारेकरी ५ पदे, माळी ३ पदे, स्वयंपाकी ४ पदे आणि सफाईकामगार २ ही अशासकीय कर्मचारी भरण्यात येणार आहेत. ही पदे कंत्राटी या बाह्ययंत्रणेद्वारे माजी सैनिक या संवर्गातून विशेष निधीतून अशासकीय स्वरूपात भरायची आहेत. त्यासाठी माजी सैनिक असणे गरजेचे आहे. माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास माजी सैनिक विधवा व माजी सैनिक किंवा माजी सैनिक विधवा उपलब्ध न झाल्यास इतर म्हणजेच नागरी संवर्गातून ही पदे भरली जाणार आहेत.