अग्रलेख : न्यूटनच्या झाडाची फांदी!
esakal May 21, 2025 02:45 PM

खगोल भौतिकीच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणारे डॉ. नारळीकर हे सर्वार्थाने ‘मराठी माणूस’ होते. विज्ञान काल्पनिकांचा मराठीतला प्रवाह नारळीकरांनी रुंद केला.

ज्ञानियांच्या जगात प्रकांड पंडित म्हणून दबदबा राखून असलेल्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाची घरातल्या नातवंडांमधली ओळख मात्र ‘मस्त गोष्टी सांगणारे, विज्ञानाचा खाऊ वाटणारे आजोबा’ एवढीच असावी, असे काहीतरी मराठी विचारविश्वाचे झाले आहे.

जयंत विष्णू नारळीकर हे नाव जागतिक विज्ञानपटावर ठळकपणे नोंदले गेले असले तरी मराठी साहित्यविश्वात मात्र छानदार विज्ञान काल्पनिका रंगवून सांगणारे नारळीकरच लक्षात राहतील. खगोल भौतिकीच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावून आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रवेत्त्यांमध्ये मानाचे पान मिळवणारे डॉ. नारळीकर हे सर्वार्थाने ‘मराठी माणूस’ होते, पिंडाने अंतर्बाह्य ‘देशी’ होते.

सर्वसामान्य लोकांनाच नव्हे, तर साहित्यिकांनाही विज्ञानाची भीती वाटते, ही गोष्ट चांगली नाही, असे त्यांना वाटत असे. लोक आणि विज्ञानातले हे अंतर कमी करण्यासाठी डॉ. नारळीकर अक्षरश: झटले. आपले आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक वलय विसरुन या कार्यात रमले. गावोगाव व्याख्यानांना गेले. शाळा-कॉलेजातही गेले. गेली काही वर्षे फारसे लिहीत नव्हते.

नाशिकच्या (९४ व्या) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारले, पण तेव्हाही प्रकृती म्हणावी तशी साथ देत नव्हती. त्यांनी हे अध्यक्षपद स्वीकारले यातही डॉ. नारळीकरांची वाचकांप्रती असलेली ओढ दिसत होती. विज्ञान काल्पनिकांचा मराठीतला क्षीण प्रवाह नारळीकरांनी आपल्या परीने बऱ्यापैकी रुंद केला.

काल्पनिकांच्या माध्यमातून विज्ञानातली गुह्ये त्यांनी सामान्य वाचकांच्या गळी उतरवली. अद्भुताची सफर घडवून आणणाऱ्या त्यांच्या कथा-कादंबऱ्या मराठी सारस्वतात अढळ स्थान मिळवत्या झाल्या आहेत. डॉ. नारळीकरांच्या पश्चात ते संचितच आपल्याला पुढला मार्ग दाखवेल.

बुद्धिमत्तेचा समृद्ध वारसा घेऊन आलेल्या नारळीकरांची शैक्षणिक कारकीर्द नेहमीच देदिप्यमान राहिली. केंब्रिजमध्ये सहविद्यार्थी स्टीफन हॉकिंगशी गप्पाष्टक जमवणारे, त्यांच्याशी टेबलटेनिस खेळणारे, विख्यात संशोधक आणि गुरुवर्य फ्रेड हॉइल यांच्याशी शास्त्रीय वादचर्चा करणारे नारळीकर हे कुठल्याही अर्थाने अत्यंत यशस्वी आयुष्य जगत होते.

गुरु हॉइल यांचा ‘स्थिरस्थिती सिद्धांत’ (स्टेडी स्टेट थिअरी) तेव्हा खगोलज्ञांमध्ये चर्चेत होता. एका महास्फोटातून विश्वाची उत्पत्ती झाली, हा जो सर्वमान्य होत चाललेला सिद्धांत होता, त्याला हॉईल यांच्या सिद्धांताने छेद दिला. त्यांच्या मते हा महास्फोट वगैरे काही झाला नाही. ‘जेनेसिस’मधल्या सश्रद्ध वर्णनाला वैज्ञानिक स्वरूप देण्याचा तो प्रकार आहे.

उल्कापात, वैश्विक धूळ, लघुग्रह, धूमकेतू याद्वारे सूक्ष्मजीवांचे विश्वात वाटप होत गेले, त्यातून विश्वनिर्मिती झाली असावी, अशी हॉइल यांची धारणा होती. पण या धारणेला बळ देणारे पुरावे मात्र हॉइल यांना देता आले नाहीत. ते जमा करण्याच्या प्रयत्नात गुरु हॉइल आणि त्यांचे लाडके शिष्योत्तम जयंत नारळीकर यांनी एका गुरुत्वीय सिद्धांताची मांडणी केली.

हा हॉइल-नारळीकर सिद्धांत खगोलभौतिकीच्या क्षेत्रात मोलाची योगदान देणारा ठरला. बुद्धिमान शास्त्रवेत्त्यांच्या मांदियाळीत नारळीकर हे भारतीय नाव दाखल झाले ते साठीच्या दशकातच. पण नंतर मायदेशातील बिरादरांचे आपण काही देणे लागतो, याची जाणीव ठेवून डॉ. नारळीकर भारतात परतले. वास्तविक तो सगळा काळ ‘ब्रेन ड्रेन’चा. पैशासाठी अनेक बुद्धिमंत परदेशी निघून जात होते.

त्याकाळात नारळीकरांनी मात्र प्रवाहाच्या उलट आपल्या जीवनाचे गलबत हाकारले. मायभूमीचे पांग फेडणे म्हणजे यापेक्षा वेगळे काय असते? मनात आणले असते तर धनांच्या राशी त्यांच्या पायाशी पडल्या असत्या. पण ते सारे सोडून त्यांनी भारतात खगोल भौतिकी संशोधनाचा पाया रचला.

पुण्याजवळ उभी राहिलेली ‘आयुका’ ही संस्था डॉ. नारळीकरांच्या कर्तृत्वाचा मानबिंदू मानायला हवा, आणि महाराष्ट्राचा तर तो अभिमानबिंदू ठरावा. जयंतरावांनी मोठ्या तळमळीने विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार केला. या कार्यात आणि एकूणच आयुष्यात मंगलाताईंची त्यांना उत्तम साथ मिळाली.

शोध प्रयोगशाळेत किंवा सैद्धांतिकांच्या मेजावर अथवा गणिती फळ्यावर लागतात. पण त्याची उपज ही कल्पनेतच झालेली असते. कल्पनेला जेव्हा बुद्धीची जोड मिळते, तेव्हा निर्मितीचे क्षण गर्भभार सुखाने साहतात. जगातील बहुतेक नामवंत खगोलशास्त्रज्ञ आवडीने विज्ञानकथा लिहितात ते याचमुळे.

गुरुवर्य हॉइल यांचा कित्ता गिरवून नारळीकरांनीही कित्येक विज्ञानकाल्पनिका लिहून मराठी वाचकांना समृद्ध करुन टाकले. त्यांच्या कथा स्वतंत्र होत्या. आधारित नव्हत्या. त्यामुळे त्याला आपोआप एक वेगळा दर्जा मिळाला. शिवाय नारळीकरांसारखा शास्त्रज्ञ हे लिहित असल्याने हा अगदीच काही कल्पनाविलास किंवा बालिशपणा नाही, हे गृहित धरले गेले.

त्या लेखनाला आपसूकच प्रतिष्ठा मिळाली. नारळीकरांच्या कथा भारतीय मानसिकतेच्या आहेत. भारतीय समाजमन कसा विचार करते हे विज्ञानकथेत प्रथमच आले. शिवाय शास्त्रज्ञ कसा विचार करतो, हेही त्यांच्या कथांतून दिसले. त्यांच्याआधीच्या विज्ञान-लेखकांच्या कथा या अनुवादित, आधारित किंवा रुपांतरित असत.

मूळ कल्पना उचलून नवी पात्रे कलम केलेली असत. नारळीकरांच्या कथांमुळे समीक्षकांचे लक्ष या प्रकाराकडे गेले. विज्ञानाबद्दल कुतुहल निर्माण करण्याचे काम नारळीकरांच्या कथा- कादंबऱ्यांनी निश्चित केले. न्यूटनने ज्या सफरचंदाच्या झाडाखाली बसून गुरुत्वाकर्षणाचे गणितीय कोडे सोडवले, असे म्हणतात.

त्या झाडाची एक फांदी आणून पुण्याच्या ‘आयुका’च्या आवारात लावलेली आहे. नारळीकरांनीच ती तिथून आणून लावली होती. नारळीकरांच्या निधनानंतर हे प्रकर्षाने जाणवले की हे फांदीचे रूपक किती किती अर्थपूर्ण आहे. नारळीकरांच्याच कथेतले एखादे भाकित खरे ठरावे, अगदी तसे!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.