आयपीएल 2025 स्पर्धेतील 63वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला तर प्लेऑफचं तिकीट मिळेल. जर दिल्लीने विजय मिळवला तर प्लेऑफच्या आशा जिवंत राहतील. अशा सामन्यात एका खेळाडूचं दोनदा डेब्यू झालं आहे. आयपीएल इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून माधव तिवारी आहे. माधव तिवारीने दुसऱ्यांदा डेब्यू केलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं हो असं आहे. कारण यापूर्वी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात धर्मशाळेत माधव तिवारी पदार्पणाचा सामना खेळण्यासाठी उतरला होता. 8 मे रोजी धर्मशाळेत पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु होता. मात्र भारत पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीमुळे सामना रद्द करण्याची वेळ आली. पहिल्या डावात 10.1 षटकांचा खेळ झाला होता. तेव्हाच मैदानात ब्लॅकआऊट करण्यात आला. बीसीसीआयने 12 मे रोजी तणाव निवळल्यानंतर नव्याने वेळापत्रक जाहीर केलं आणि हा सामना रद्द झाल्याचं जाहीर केलं.
बीसीसीआयने हा सामना रद्द केला आणि 24 मे रोजी नव्याने खेळवला जाईल हे स्पष्ट केलं. त्यामुळे 10.1 षटकांचा खेळातील सर्व रेकॉर्ड पुसला गेला. या सामन्यात माधव तिवारीने पदार्पण केलं होतं. तसेच एक षटक टाकलं होतं. या षटकात त्याने 14 धावा दिल्या होत्या. पण त्याचं हे षटक आता रेकॉर्डवर नाही. त्यामुळे हा सामना त्याचा डेब्यू सामना होता असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यामुळे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना त्याचा डेब्यू सामना ठरला आहे. माधव तिवारीने या सामन्यात काही षटक टाकलं नाही. मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे. अक्षर पटेल आजारी असल्याने कर्णधारपदाची जबाबदारी फाफच्या खांद्यावर आहे. त्यामुळे फाफच्या नेतृत्वात त्याचं संघात पदार्पण झालं असं म्हणावं लागेल.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 180 धावा केल्या आणि विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात सूर्यकुमार यादवने सुरुवातीला सावध पण नंतर आक्रमक खेळी केली. त्याने 43 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 73 धावा केल्या. तर नमन धीरने शेवटी येत 8 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 24 धावांची खेळी केली. या मैदानावर फलंदाजी करणं कठीण असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला आव्हान कठीण जाऊ शकतं.