सुशिक्षित कुटुंबात हुंडाबळी, महाराष्ट्र कुठे जातोय? – सुप्रिया सुळे
Marathi May 22, 2025 02:25 AM

ही वेळ एकमेकांवर टीका करण्याची नाही; कारण आपण सगळे भारतीय एक आहोत. आज दहशतवादाविरोधात सुरू असलेली लढाई ही कोणतीही वैयक्तिक किंवा राजकीय लढाई नाही, तर ती आपल्या देशाच्या एकात्मतेसाठीची सामूहिक लढाई आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही अतिशय वेदनादायक घटना आहे. हगवणे कुटुंब मुळशी आणि पुण्यातील मोठे नाव असलेले कुटुंब आहे. त्यांचे आजोबा पंचायत समितीमध्ये अनेक दशक चांगले काम केले आहे. आताच्या पिढीत काय झाले आहे हे अतिशय धक्कादायक आहे. मी पोलिसांकडून जी काही माहिती घेतली, एकूण जो रिपोर्ट पोलिस आणि मीडियाकडून आला आहे त्याच्यातून ग्रे एरिया आला आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की आत्महत्या आहे तर काहींचे म्हणणे आहे की ही हत्या आहे.असेही सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,24 वर्षांची मुलगी होती ती. या कुटुंबाने सहा दशक काँग्रेससोबत काम केले आहे. पण आता ही घटना ऐकून धक्का बसला आहे. अशा सुशिक्षित कुटुंबात हुंडाबळी होत असेल तर महाराष्ट्र कुठे चालला आहे आणि एक नाही दोन दोन सुनांवर. हा माझ्या मतदारसंघातला विषय आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी कार्यक्रम होता. मी त्या कार्यक्रमाला गेले नाही. कारण मला दाखवून द्यायचे होते की तुमच्या घरातल्या सुनेची डोमेस्टिक व्हायलन्सची तक्रार आहे. त्यांच्या सुना जर पोलिस ठाण्यात जात असतील आणि त्यांच्या केसेस चालू असतील म्हणून मी त्या कार्यक्रमात नाही गेले. या 24 वर्षांच्या मुलीला या पुरोगामी महाराष्ट्रात न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी जी काही लढाई लढावी लागेल ती मी लढायला तयार आहे. महाराष्ट्राच्या या लेकीला न्याय मिळवूनच राहणार, असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी बोलताना केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा विषय अतिशय गंभीर आहे. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली असून, आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी राज्य सरकारने अधिक गंभीरपणे कार्यवाही करावी, अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.