पिंपरी, ता. २१ : शहरात आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर वाढला असून, मुसळधार पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. यामुळे घराघरांत कपाटात ठेवलेले रेनकोट पुन्हा बाहेर आले आहेत. तर नवीन रेनकोट खरेदी करण्यासाठी नागरिक दुकानांकडे धाव घेत आहेत. परिणामी, शहरातील विविध वस्त्र विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये पावसाळ्यापूर्वीच रेनकोटसाठी मागणी वाढली आहे.
शहरात अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक यांना आपल्या दैनंदिन कामकाजात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पावसापासून बचावासाठी रेनकोट हेच सर्वात उपयुक्त साधन ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक दुकानदारांनी रेनकोटचा नवीन स्टॉक मागविण्यासाठी ऑर्डर दिल्या आहेत. दरवर्षी जून महिन्याच्या सुमारास रेनकोटसाठी मागणी वाढते. मात्र, यंदा मे महिन्यातच अवकाळी पाऊस कोसळू लागल्याने ग्राहकांची गर्दी लवकरच वाढली आहे. रेनकोटच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. बाजारात रेनकोटची विक्री साधारणतः पाचशे रुपयांपासून आहे. विशेषतः मुलांचे आकर्षक डिझाईन्स आणि दोन्ही भागांचे (जॅकेट व पँट) रेनकोट अधिक मागणीमध्ये आहेत. निसर्गाच्या या बदलत्या लहरी हवामानामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. रेनकोट, छत्र्या यांचा वापर करून स्वतःला सुरक्षित ठेवावे, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. पावसाचा जोर पुढील काही दिवस राहण्याची शक्यता असल्याने रेनकोटसारख्या वस्तूंना अजूनही अधिक मागणी राहण्याची शक्यता आहे.
शहरात आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे. दोन दिवसांपासून तर मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे रोज रेनकोटच्या खरेदीसाठी ग्राहक येत आहेत. मागणी वाढल्याने सध्या आमच्याकडे स्टॉक कमी पडतो आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच आणखी स्टॉकची ऑर्डर दिली आहे.
- सुरेश चौधरी, विक्रेता, पिंपरी