Pahalgam Attack : पाकड्यांना शिकवला धडा, पहलगाम हल्ल्याला एक महिना, भारत अजून काय काय करणार
GH News May 22, 2025 02:07 PM

जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याला एक महिना पूर्ण झाला आहे. त्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकमधील दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हल्ला चढवला. ड्रोन आणि क्षेपणास्त्राने त्या जागांवर अचूक निशाणा साधला. त्यानंतर पाकच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशात संघर्ष पेटला. नंतर चारच दिवसात पाकड्यांनी युद्धविरामासाठी भारताशी संपर्क केला. या एका महिन्यात भारताने काय काय कामगिरी बजावली? आणि पुढे काय काय होणार?

NIA कडून पहलगाम हल्ल्याचा तपास

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधील बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी धर्म विचारून भारतीय पर्यटकांवर गोळीबार केला होता. यामध्ये 26 पर्यटकांचा जीव गेला होता. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने NIA ने या सर्व प्रकरणाची सूत्र हातात घेतली. या हल्ल्यामागे ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (TRF) ही लष्कर-ए-तैयबाशी संबंधित संघटित असल्याचा दावा करण्यात येत आहे. एनआयए याप्रकरणी तपास करत आहे.

सिंधु जल करार रद्द

पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीच 23 एप्रिलला, भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. पाणी आणि रक्त एकाचवेळी वाहू शकत नाही, अशा स्पष्ट शब्दात भारताने पाकला ठणकावले आहे. पाकिस्तानकडून वारंवार सिंधु जल करार पुन्हा सुरू करण्याचा आग्रह करत आहे. पण त्याला भारताने झिडकारले.

ऑपरेशन सिंदूर

या हल्ल्याच्या 13 दिवसानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र डागले. या कारवाईत पाक व्याप्त काश्मीर आणि थेट पाकमधील 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर सुद्धा दिले. त्यात त्यांचे हवाईतळ उद्ध्वस्त करण्यात आले.

कुटनीतीचा केला वापर

भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तातील अनेक अधिकारांना देश सोडण्यास सांगितले. तर पाकिस्तानी नागरिकांनाही मुदत देत देशाबाहेर जाण्यास सांगितले. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द करण्यात आले. तर पाकिस्तानातील भारतीय नागरिकांना परत बोलावले.

आता जागतिक मंचावर मोठा प्रयत्न

पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठपुरावा करत असल्याचे अनेकदा समोर आले. आता केंद्र सरकार विविध देशांमध्ये खास प्रतिनिधीमंडळे पाठवून पाकिस्तानच्या दहशतवादी संबंधांबद्दल जागतिक समुदायाला माहिती देणार आहे. भारतीय विविध पक्षीय खासदारांची शिष्टमंडळं फ्रान्स, इटली, जर्मनी, डेनमार्क, यूके आणि बेल्जियम येथे भेट देणार आहे.

पहलगामचे मारेकरी मोकाट

पहलगाम हल्ला घडवून आणणारे दहशतवादी आणि त्यांचे आका अजूनही मोकाट आहेत. एनआयए त्यादृष्टीने तपास करत आहे. या सर्वांना शोधून त्यांना धडा शिकवण्याची मागणी होत आहे. 24 एप्रिलपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू झाला. त्यानंतर 7 मे रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. तर 10 मे रोजी दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केला. पण ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार असल्याचे समोर येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.