Health Tips : पोटातून गुडगुड आवाज येण्यामागे असू शकतात ही कारणे
Marathi May 22, 2025 07:27 PM

तुमच्यासोबत कधी असे घडले आहे का की तुम्ही काही लोकांसोबत बसला आहात आणि अचानक तुमच्या पोटातून आवाज येतो. तेव्हा अशा परिस्थितीत खूपच लाजिरवाणे वाटते, पण ते नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकत नाही. ही शरीरात घडणारी एक अनैच्छिक क्रिया आहे ज्यावर आपले नियंत्रण नसते. पण प्रश्न असा पडतो की हे का घडते ? भूक लागल्यावर पोटातून आवाज का येतो? यामागील उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

पोटातून आवाज का येतो?

पोटातून येणारा आवाज हा तुम्हाला भूक लागल्याचे लक्षण आहे. खरं तर, जेव्हा पोट रिकामे असते तेव्हा पोटाचे स्नायू आकुंचन पावतात जेणेकरून आत असलेला वायू आणि पचन द्रव बाहेर काढता येतो. स्नायूंच्या या हालचालीमुळे पोटातून आवाज येतो. या प्रक्रियेला पेरिस्टॅलिसिस म्हणतात. ही हालचाल खरंतर नेहमीच चालू असते, मात्र पोट रिकामे असताना हा आवाज अधिक मोठा असतो. जेव्हा रिकाम्या पोटी स्नायू आकुंचन पावतात तेव्हा या हालचालीमुळे निर्माण होणारा आवाज मोठ्याने बाहेर येतो.

हार्मोन्स देखील बजावतात महत्त्वाची भूमिका

यामध्ये भूक लागण्याचे संप्रेरक घ्रेलिन देखील महत्त्वाची भूमिका बजावते. घ्रेलिन हार्मोन हा भूकेचा हार्मोन आहे, जो शरीराला आता अन्न खाण्याची गरज असल्याचे संकेत देतो. जेव्हा पोट रिकामे असते तेव्हा या हार्मोनची पातळी वाढते. यामुळे पोटाचे स्नायू जलद आकुंचन पावतात. म्हणूनच गुरगुरण्याचा आवाज अधिक मोठा होतो.

पोटातील गुरगुरणे कमी करता येईल का?

हा आवाज दाबण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे काहीतरी खाणे. जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुमच्या पोटाच्या स्नायूंच्या या हालचालीचा आवाज कमी होतो. खाल्ल्याने हा आवाज दाबला जातो आणि आपल्याला तो ऐकू येत नाही. पण पोटाच्या स्नायूंची हालचाल सुरूच राहते.

यावरूनच समजते की पोटातून येणारा गुरगुरण्याचा आवाज हा दुसरे तिसरे काही नसून तुमच्या शरीराला संदेश देण्याचा एक मार्ग आहे की आता अन्न खाण्याची वेळ आली आहे.
मात्र कधीकधी पोटातील आवाज पोटाशी संबंधित समस्यांमुळे देखील असू शकतात , जसे की गॅस, अतिसार, पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठता.

कधीकधी पोटातील आवाज हा अन्नाचे नीट पचन न झाल्यास देखील येतो. पण सहसा, पोटातून गुरगुरण्याचा आवाज येणे ही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही.

हेही वाचा : Fashion Tips : कुल लूकसाठी लेटेस्ट प्रिंट डिझाइन्स


संपादित – तनवी गुडे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.