पुढच्या महिन्यात टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी संघात कोण असेल याची खलबतं सुरु झाली आहेत. 24 मे रोजी नवा कसोटी कर्णधार आणि टीम इंडिया जाहीर होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. पण आता या संघाच्या घोषणेची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. कारण माजी क्रिकेटपटू वसीम जाफने संघ आधीच घोषित केला आहे. या संघात 16 खेळाडूंची निवड केली असून जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. शुबमन गिलला कसोटी संघात स्थान दिलं असून त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवलं आहे. त्यामुळे वसीम जाफरच्या मनात बुमराह कसोटी कर्णधार व्हावा असंच दिसत आहे. वसीम जाफरने सलामीसाठी यशस्वी जयस्वालची निवड केली आहे. तर केएल राहुलला त्याच्या जोडीला ओपनिंगची संधी दिली आहे. तर उपकर्णधार शुबमन गिलला तिसऱ्या स्थानावर स्थान दिलं आहे.
वसीम जाफर चौथ्या स्थानासाठी थोडा गोंधळलेला दिसत आहे. कारण त्याने या स्थानासाठी श्रेयस अय्यर आणि करुण नायर यांचा पर्याय दिला आहे. असंच वेगवान गोलंदाजीत दिसून आलं आहे. अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा की आकाशदीप असा पर्याय त्याने दिले आहेत. त्यामुळे 16 खेळाडूंची निवड करताना त्याने तीन पर्याय अधिकचे दिले आहेत. त्यामुळे कसोटी संघ निवडताना वसीम जाफरी संभ्रमात पडल्याचं दिसत आहे.
वसीम जाफरने संघात रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन फिरकी अष्टपैलूंची निवड केली आहे. तसेच या संघात तिसरा फिरकीपटू म्हणून एकमेव कुलदीप यादवची निवड केली आहे. तर वेगवान गोलंदाजीसठी जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजची निवड केली आहे. तसेच अष्टपैलू शार्दुल ठाकुर यालाही संधी दिली आहे.
वसीम जाफरने निवडलेल्या संघात अक्षर पटेलला स्थान दिलेलं नाही. इतकंच काय तर फॉर्मात असलेल्या साई सुदर्शनलाही डावललं आहे. तर 10 किलो वजन कमी करणाऱ्या सरफराज खानला संघात स्थान दिलं आहे. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यात काही रस दाखवलेला नाही.