कल्पाना करा की जर तुम्ही जंगलात फिरत आहात आणि जंगलामधून फिरत असताना तुमची नजर एका चमकणाऱ्या डब्यावर पडली, हा डबा दगडांच्या ढिगाऱ्यामध्ये आहे, तर तुमची उत्सुकता निश्चितच वाढणार, अशीच घटना चेक गणराज्य देशामध्ये घडली आहे. चेक गणराज्य देशामध्ये असलेल्या क्रकोनोश नावाच्या डोंगर रांगांमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी ही बातमी आहे. ज्याला हा डबा सापडला त्याच तर क्षणात आयुष्यच बदलून गेलं. कारण त्या डब्यामध्ये जे सापलडं ती काही सामान्य गोष्ट नव्हती.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दोन पर्यटक जंगलामध्ये फिरत होते. फिरत असताना त्यांची नजर तिथे असलेल्या एका दगडाच्या ढिगाऱ्यावर गेली. त्या दगडांच्या ढिगाऱ्याखाली त्यांना एक रहस्यमयी बॉक्स आढळून आला. त्यांना या गोष्टीची थोडी देखील कल्पना नव्हती की या डब्यामध्ये खजाना असेल. त्यांनी हा चमकणारा डबा उघडला. त्यामध्ये त्यांना काही गोष्टी सापडल्या, त्यांनी हा डबा तेथील पुरातत्त्व विभागाकडे नेला.
हा डबा पाहून पुरात्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील प्रचंड धक्का बसला. कारण या डब्यामध्ये तब्बल 8 सोन्यांच्या बांगड्या, 17 सिगारचे डब्बे, एक कंगवा आणि सर्वात मोठी आर्श्चयाची गोष्ट म्हणजे तब्बल 598 सोन्याची नाणी आढळून आली आहे. या सोन्याचं वजन साडेतीन किलोच्या आसपास असल्याची माहिती पुरातत्व विभागाकडून देण्यात आली आहे. या सोन्याचं बाजार मूल्य सध्या तीन कोटी रुपयांच्या आसपास आहे.
दरम्यान हा डबा नेमका कोणत्या काळातील आहे. तीथे तो कसा आला, या संदर्भात आता पुरातत्व विभागाकडून शोध सुरू आहे, काही तरी महत्त्वाची माहिती यातून हाती लागू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा डबा जंगलामध्ये कसा आला, या डब्याचा आणि प्राचिन संस्कृतीचा काही संबंध आहे का? की तो कोणीतरी लपवण्याच्या उद्देशानं या दगडाच्या ढिगाऱ्याखाली ठेवला आहे, याचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.