Kolhapur : कॅमेरे लावा, कचरा रोखा; तीन गावांतील सरपंचांची मागणी; खांडसरी नाका पुन्हा फुल्ल
esakal May 22, 2025 09:45 PM

विवेक पाटील

शिंगणापूर : खांडसरी नाका कचऱ्याचा विषय गंभीर बनत आहे. तीन ग्रामपंचायती आणि महानगरपालिका यांच्या समन्वयाच्या अभावाने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले कचरा उठावाचे आदेश फक्त कागदावरच असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. किती जागृती केली, तरी लोक ऐकत नाहीत, असे तिन्ही गावच्या सरपंचांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिघांनी येथे ३६० अँगल सीसीटीव्ही बसवावा व त्यांचे नियंत्रण जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ यांच्या नियंत्रणात ठेवावे, मागणी केली आहे.

काही महिन्यांपूर्वी खांडसरीवरील कचरा उठावाबाबत शिंगणापूरमधील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ आढावा बैठक बोलावली. ५० वर ग्रामपंचायत अधिकारी व सरपंचांनी उपस्थिती लावली. पर्यावरणतज्ज्ञ, सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांत कचरा उठाव व्यवस्थापन कसे करावे याची दिवसभर कार्यशाळा झाली. सकारात्मक चर्चेनंतर कचरा उठावही झाला.

नंतर परिस्थिती 'जैसे थे' झाली. सरपंचांनी कचरा घंटागाडीत टाका, कचरा पेटवून देऊ नका अशी जागृती केली; पण लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने पुन्हा खांडसरी नाक्यावर कचऱ्याने परिसरात रोगराई पसरत आहे. खांडसरी कचराप्रश्नी कायमचा तोडगा निघण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे.

पुरेशी यंत्रणाच नाही...
बालिंगा, नागदेववाडी व शिंगणापूर ग्रामपंचायतींनी काहीवेळा कचऱ्याचा उठाव केला, पण सातत्य नाही. याचे कारण म्हणजे एवढ्या प्रचंड प्रमाणात उठाव केलेला कचरा विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामीण हद्दीत 'आऊटसोर्स' नाही. तिन्ही ग्रामपंचायतकडे कचरा उठवासाठी पुरेशी यंत्रणा, कर्मचारी नाहीत.

खांडसरी नाका बालिंगा व नागदेववाडी गावाच्या हद्दीत येतो. त्या ग्रामपंचायतीनी कचऱ्याचा उठाव केला पाहिजे. जेथे कचरा पडतो तिथे सीसीटीव्ही बसवावा.
- रसिका पाटील, सरपंच, शिंगणापूर

कचरा प्रश्न कायमचा संपुष्टात येण्यासाठी प्रयत्नशील आहोत. बालिंगाजवळ घनकचरा प्रकल्प उभा करण्यासाठी प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित आहे.
- राखी भवड, सरपंच, बालिंगा.

लोकांनी कचरा घंटागाडीतचं टाकावा. खांडसरीला महानगरपालिका हद्द लागून असल्याने त्यांनीही कचरा उठाव करणे गरजेचे आहे.
-रवी पोतदार, सरपंच, नागदेववाडी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.