मुंबई : ‘‘राज्यात गेले काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत,’’ असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील सर्व यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. यासाठी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. त्यासाठी महसूल आणि कृषी विभागाने पथके स्थापन करून पंचनामे करावेत. तसेच ही कार्यवाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
पाटील म्हणाल्या, ‘‘अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास सरकार नेहमीच प्राधान्य देत आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी २०२३- २०२४ या वर्षात ५४ लाख ८० हजार पात्र शेतकऱ्यांना ४ हजार ८३३ कोटी रुपये तर एक एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ६९ लाख ३ हजार शेतकऱ्यांना सहा हजार ९८९ कोटी रुपये आणि एक एप्रिल २०२५ ते २१ मे २०२५ या कालावधीत ९ लाख ७ हजार शेतकऱ्यांना ९७५ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.’’