बांगलादेशात मोहम्मद युनूस चारही बाजूंनी संकटात, राजीनामा देण्याची तयारी?
GH News May 23, 2025 12:08 PM

Bangladesh Muhammad Yunus: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. देशात सर्व बाजूंनी घेरले गेल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी सहानभूती मिळविण्यासाठी हा शेवटचा डाव खेळल्याचे मानले जात आहे. बांगलादेशातील परिस्थिती सांभाळणे त्यांना अवघड जात आहे. राजकीय पक्षांकडून विरोध होत असल्याने सरकार चालवणे त्यांना अवघड झाले आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या निदर्शनांनंतर मोहम्मद युनूस यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.

बीबीसी बांगलाने विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल सिटीझन पार्टी (सीपी) चे प्रमुख नाहिद इस्लाम यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, आम्हाला युनूस सर यांच्या राजीनाम्याची बातमी ऐकायला मिळत आहे. म्हणून मी या विषयावर चर्चा करण्यासाठी सरांना भेटायला गेलो. त्यावेळी त्यांनी आपण राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. या परिस्थितीत आपणास काम करणे अवघड होत असल्याचे युनूस यांनी नाहिद यांना सांगितले. नाहिद इस्लाम यांच्यानुसार, मोहम्मद युनूस आपणास ओलीस ठेवले जात असल्याचा आरोप करत आहे. यापद्धतीने आपण काम करु शकत नाही, असे त्यांनी म्हटले.

ते विधान अल्टिमेटम

युनूस यांच्या राजीनाम्याची चर्चा लष्करप्रमुखांविरुद्ध आंदोलन सुरू करण्याचा डाव म्हणून पाहिली जात आहे. कारण बांगलादेशतील लष्करप्रमुखांनी बुधवारी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, देशाबाबतचा निर्णय केवळ निवडून आलेल्या सरकारनेच घ्यावे. लष्करप्रमुखांचे हे विधान मोहम्मद युनूस यांना दिलेला अल्टिमेटम समजले जात आहे. कारण निवडणुका होताच युनूस यांचा कार्यकाळ संपणार आहे.

निवडणूक घेण्यासाठी बांगलादेशात आंदोलन सुरु आहे. विद्यार्थी चळवळीत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांचा पक्ष एनसीपीने बांगलादेशातील निवडणूक आयोगावर बीएनपीशी संगनमत केल्याचा आरोप करत आहे. कारण बीएनपी डिसेंबरपर्यंत निवडणूक घेण्याची मागणी करत आहे. एनसीपीने म्हटले की, विद्यामान निवडणूक आयोगाच्या पुढाकारात निवडणुका झाल्या तर निवडणुकीत आमचा पक्ष सहभाग घेणार नाही. कारण हा निवडणूक आयोग पक्षपात करत आहेत. निवडणूक आयोगाचे कार्यालय म्हणजे बीएनपी पक्षाचे कार्यालय झाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.