वरचेवर जगलं पेटवणारे वणवे नैसर्गिक की मानवनिर्मित, यामुळे पर्यावरणाला कसा होतो धोका?
BBC Marathi May 23, 2025 02:45 PM
Getty Images

उन्हाळा सुरू होताच जंगलात आग लागण्याच्या म्हणजेच वणव्याच्या घटना ऐकायला, वाचायला, पाहायला मिळतात. दरवर्षी शेकडो हेक्टरचं जंगल या आगीत नष्ट होतं.

दरवर्षी रस्ते, वाढतं शहरीकरण, औद्योगिक विकास आणि खाणींच्या नावाखाली हजारो वृक्षं तोडली जातात. त्यातच वणव्यांची भर पडून आधीच कमी झालेलं जंगल आणखी कमी होत आहे.

जंगलातील आगीत वन्यजीव, पशू-पक्षी होरपळून मृत्यू पावतात. यावर्षीही महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्या, यात वनसंपदेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

वणव्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाकडून दरवर्षी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळतं, पण तरीही वणव्यांच्या घटनांचं प्रमाण हवं तसं कमी होताना दिसत नाही.

मार्च 2025 मध्ये रायगड चिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील धामणसईमधील डोंगरमाथ्यावर असलेल्या इंदरदेव धनगरवाडी डोंगरात अचानक पेटला, या वणव्याने अख्खं गाव बेचिराख करुन टाकलं.

यात 44 घरं, 15 गोठे आणि एक शाळा जळून खाक झाली. त्यासोबतच वनसंपदेचीही प्रचंड हानी झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले, जंगलातील अनेक जीवही होरपळून मृत्युमुखी पडले.

राज्यभरात विविध ठिकाणी अशाप्रकारे वणवे लागून वनसंपदेसह लोकांचंही मोठं नुकसान होतं. पण जंगलात इतक्या मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या या आगींमागचं नेमकं कारण काय? ती आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न केले जातात?

वनविभागासह जंगलांच्या कुशीत वसलेल्या गावांची काय भूमिका आहे? तसेच या आगींचा पर्यावरण आणि जैवविविधतेवर काय परिणाम होतो या सर्वांचा घेतलेला आढावा.

वणव्यांमागची कारणं काय?

जंगलातील आगींच्या घटनांच्या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार नैसर्गिक आगीच्या तुलनेत मानवी कृती प्रत्यक्षपणे वणव्यांच्या घटनांना कारणीभूत ठरत असल्याचं समोर आलं आहे.

शिवाय उन्हाळ्यातील कोरडं तापमान आणि वेगात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे जंगलातील आगींचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत आम्ही वनविभागातील वनरक्षक आणि फायर वॉचर यांच्याशीही चर्चा केली.

धानोरा तालुक्यातील मोहली बिटमध्ये फायर वॉचर म्हणून कार्यरत अभय कराडे सांगतात की, "महाराष्ट्रात पानझडी जंगलं आहेत. तेंदूपत्ता आणि मोहफूल संकलन हा येथील स्थानिकांच्या रोजगाराचा मोठा भाग आहे.

जंगलाला आग लागली तर तेंदूपत्त्याची गुणवत्ता वाढेल, उत्पन्न वाढेल असा लोकांचा समज आहे. तसेच, मोहाच्या झाडाखाली आग लावल्यानं कचरा साफ होऊन मोहाची फुलं वेचणं सोपं जातं, म्हणूनही आग लावली जाते."

BBC

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील चौराकुंड रेंजचे वनरक्षक सुरज भगत गेल्या 6 वर्षांपासून येथे कार्यरत आहेत. या कारणांना दुजोरा देत भगत सांगतात की, "काही शेतकरी शेतातील कचरा साफ करण्यासाठी आग लावत असतात. हे शेत जंगलाला लागून असल्यास वणवा पेटण्याची शक्यता असते. तसेच उन्हाळ्यात गुरांसाठी चारा कमी होऊन जातो आणि जंगलात आग लावल्याने चारा जास्त उगवेल असाही गैरसमज लोकांमध्ये आहे."

"मी येथे कामावर रुजू झालो तेव्हापासून आतापर्यंतची स्थिती पाहिल्यास यावर्षी दुप्पट-तिपटीनं आग लागत आहे," मेळघाटातील 99 टक्के आगी मानवनिर्मित असल्याचंही भगत बोलताना म्हणाले.

यावर्षीही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घटना

वरील माहितीनुसार राज्यात यावर्षी 1 जानेवारी ते 7 एप्रिलदरम्यान हजारहून अधिक आगीच्या घटना घडल्या आहेत. 2024 साली या काळात आगींचा आकडा 515 होता मात्र, यावर्षी यात दुपटीनं वाढ झाली आहे.

देशभरात 1 जानेवारी ते 7 एप्रिलदरम्यान एकूण 11,908 मोठ्या आगींची नोंद करण्यात आली. या आकडेवारीनुसार जंगलातील आगीच्या घटनांमध्ये महाराष्ट्र (1,245) देशात दुसऱ्या स्थानी, 1743 घटनांसह मध्यप्रदेश पहिल्या तर छत्तीसगढ (1045) तिसऱ्या स्थानावर असल्याचे दिसून आले.

BBC गडचिरोली जिल्ह्यातील आगींच्या घटना

भारतीय वन सर्वेक्षण 2023 च्या आकडेवारीनुसार राज्याचं वन आच्छादित क्षेत्र 50, 858 इतकं असून राज्यातील सर्वाधिक वनाच्छादित क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आहे. तर मागील दोन वर्षांत राज्यातील वनक्षेत्र सुमारे 54.5 चौ. किमीने घटल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

BBC राज्यात 5 एप्रिल ते 22 एप्रिलदरम्यान लहान मोठ्या अशा 6269 आगींची नोंद करण्यात आली आहे.

इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट (ISFR) 2015 नुसार, देशाच्या जवळपास 6 टक्के वनाच्छादित भागात आग लागण्याची शक्यता जास्त आहे. त्यात महाराष्ट्राचा गडचिरोली आणि चंद्रपूर आणि हा पट्टा येतो.

दरम्यान, राज्यातील सर्वाधिक वनाच्छादित भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात 5 - 22 एप्रिलदरम्यान आगीच्या लहान-मोठ्या अशा मिळून 1088 घटनांची नोंद करण्यात आली हे विशेष.

आगींवर नियंत्रण कसं मिळवतात?

जंगलातील आग विझविण्याची जबाबदारी प्रामुख्यानं वनविभागाचे फायर वॉचर आणि फॉरेस्ट गार्ड्स यांच्यावर असते. त्यांना रिअल टाईम डेटा आणि आगीच्या लोकेशेनची माहिती फोनवर मिळत असते.

फायर वॉचर अभय कराडे सांगतात की, "जंगलात आग लागते तेव्हा आम्हाला मोबाईलवर मेसेज येतो. आग विझवण्यासाठी आमच्याकडे ब्लोअर मशीन आहे. जिथे आग लागली आहे0 त्या जागेचं लोकेशन मिळाल्यानंतर गुगल मॅपच्या मदतीनं आम्ही त्या ठिकाणी जाऊन ब्लोअर मशीनने आग विझवतो."

Bhinuram Usendi गडचिरोलीच्या जंगलात लागलेली आग विझवताना फायर वॉचर

"फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आम्ही जंगलात फायर लाईन आखत असतो. या फायर लाइनच्या दोन्ही बाजूंच्या ठराविक अंतरावरील गवत आणि पालापाचोळा साफ करून टाकतो.

जेणेकरुन वणवा लागला तरी तो फायर लाईनजवळ अडेल आणि पसरणार नाही. ही वणवा रोखण्याची सर्वात चांगली पद्धत आहे.

त्यासह सॅटेलाईटच्या माध्यमातून आधुनिक तंत्रप्रणालीद्वारे रीअल टाईम डेटा आम्हाला मिळत असतो. ही माहिती संबंधित बिटातील व्यक्तीपर्यंत पोहोचताच तो आग विझवण्यासाठीच्या संसाधनासह त्या भागात वेळेत पोहचून आगीवर नियंत्रण मिळवतो," असंही भगत यांनी सांगितलं.

देशातील गेल्या दोन वर्षांची स्थिती

देशभरातील जंगलांच्या स्थितीबाबत मध्ये प्रकाशित करण्यात आला. यातील आकडेवारीनुसार 2023-2024 देशभरातील जंगलामध्ये वणव्याच्या 2 लाख 3 हजार 554 घटना नोंदविण्यात आल्या.

वणव्यांच्या घटनांमध्ये राज्यवार आकडेवारीत महाराष्ट्र (16,008 वणवे) देशात पाचव्या क्रमांकावर असून पहिल्या चारमध्ये उत्तराखंड (21,033) त्यानंतर, ओडिशा (20,973), छत्तीसगढ (18,950) आणि आंध्रप्रदेश (18,174) ही राज्यं आहेत.

Suraj Bhagat जंगलातील वणवा

तर, जिल्हावार पाहायचं झाल्यास गडचिरोली जिल्ह्यात (7 हजार 42) देशात सर्वाधिक वणव्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

या रिपोर्टनुसार गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील वनक्षेत्र सुमारे 54.4 चौरस किमीने घटलं आहे. यात पालघरमध्ये सर्वाधिक 87 चौरस किमी वनक्षेत्र कमी झालं असून त्यापाठोपाठ नंदुरबारमध्ये 64 चौरस किमी तर पुण्यात सुमारे 4.57 चौरस किमी वनक्षेत्राची घट झाली.

तर, ग्लोबल फॉरेस्ट वॉचवरील आकडेवारीनुसार 2001 ते 2023 दरम्यान आगीमुळे नष्ट असून महाराष्ट्रातील आगीत भस्मसात झालंय.

वनविभागाचे प्रयत्न आणि स्थानिकांची भूमिका

जंगलातील वणव्यामुळं वनसंपदेचं मोठं नुकसान होतं याचा फटका वन्यजीवांसह येथील स्थानिकांनाही बसतो. या घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाकडून काय उपाययोजना केल्या जातात? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

याबाबत माहिती देताना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मीना म्हणाले की, "उन्हाळ्याच्या सुरुवातीस पानगळतीला सुरुवात होते. फेब्रुवारीच्या अखेरीस मोहफुल तसेच तेंदूपत्ता संकलनदेखील सुरू होत असून याच काळात वणव्यांच्या घटना जास्त घडत असतात. यातील जास्तीत जास्त आगी मानवनिर्मित असतात."

पुढे ते सांगतात की, "आगीच्या घटनांमुळं जंगलाचं मोठं नुकसान होतं. त्यासाठी वनविभागाकडून जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात, ग्रामस्थांना गोळा करून त्यांना जंगलांचं महत्व पटवून दिलं जातं. जागोजागी बॅनर लावून त्यामाध्यमातूनही जनजागृती केली जाते."

BBC

जंगलातील आगींबाबत जंगलकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांची काय भूमिका आहे, याबाबतही आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत बोलताना गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील वनहक्क समिती कार्यकर्ता चंद्रकांत किचक म्हणाले की, "आम्ही जांगदा ग्रामसभेच्या माध्यमातून वणवा विझवण्यासाठी एक पथक तयार केलं आहे. आधी आमच्याकडे मशीन नव्हती, ती वनविभागाकडून मागवावी लागायची. परंतु, कधी इंधन संपल्यानं ती बंद पडायची. अशावेळी वणवा विझवणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून दोन मशीन विकत घेतल्या आहेत."

"आम्ही ग्रामसभेच्या बैठकीत जंगलात आग लावायची नाही, असा नियम केला. कारण याने जंगलाचं, जंगलातील औषधी वनस्पतींचंही मोठं नुकसान होतं.

सोबतच वणवा विझवण्यासाठी जाणाऱ्यांना ग्रामसभेच्या माध्यमातून काही मानधन दिलं जातं. त्यामुळे गावकरीही व्यवस्थित जबाबदारी पार पाडतात," असं किचक सांगतात.

Chandrakant Kichak जंगलातील आग विझवायला जात असलेले गावकरी

भामरागड परिसरातील सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे समन्वयक, चिन्ना महाका यांनीही स्थानिकांची भूमिका मांडली. सोबतच रोजगाराचा प्रश्न आणि स्थानिकांची नाराजीही बोलून दाखवली.

ते म्हणाले, "तेंदूपत्ता आणि मोहफुलं संकलनादरम्यान आगींच्या घटना घडतात. पण सोबतच विद्युत तारांच्या घर्षणाने किंवा एखादी तार तुटली तर त्यानेही आग लागते. तसंच तेंदुपत्ता चांगला यावा म्हणून काही ठिकाणी कंत्राटदारही आग लावून देत असल्याचं दिसून आलं आहे."

Bhinuram Usendi गडचिरोलीच्या जंगलात लागलेली आग विझवताना फायर वॉचर

चिन्ना महाका म्हणाले, "रोजगार हे यामागचं मोठं कारण आहे. आमच्या भागातील बहुतांश लोकांचं जीवन जंगलावर अवलंबून आहे. तेंदूपत्ता-मोहफुलं यातून स्थानिकांना चांगलं उत्पन्न मिळतं. ज्यावर जीवन अवलंबून आहे, ते जंगल नष्ट होऊ नये, असं स्थानिकांचंही मत आहे.

"जंगलात कुठे आग लागली असेल तर ती विझवण्यासाठी गावकरीही प्रयत्न करतात, वनविभागातील कर्मचाऱ्यांना मदतही करतात.

यावर्षीही आम्ही आमच्या परिसरातील ग्रामसभेच्या बैठकीत ग्रामस्थांकडून जंगलाला आग न लावण्याबाबत शपथ घेतली. ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी शक्य तितके प्रयत्न करत असतो," असं महाका सांगतात.

Bhinuram Usendi नैसर्गिक आगीच्या तुलनेत मानवी कृती प्रत्यक्षपणे वणव्यांच्या घटनांना कारणीभूत ठरत असल्याचं समोर आलं आहे.

परंतु, जंगलातील आगीला फक्त स्थानिकच जबाबदार आहेत, असं नाही. बरेचदा ठेकेदार त्याच्या बिटात चांगलं उत्पन्न यावं म्हणून आग लावून देतो. कोणी जंगलात फिरायला गेले आणि बिडी, सिगारेटची थोटकं न विझवता तेथेच टाकून दिली तरीही आग लागू शकते. यासह इतर कारणंही आहेत, असं चिन्ना महाका सांगतात.

"आधी लोकं स्वत: जंगलांप्रती सजग असायचे, आताही आहेत पण सद्यस्थिती पाहता लोकांचा हिरमोड झालाय. आधी इथले लोकं पूर्णपणे जंगलावर अवलंबून होते, वनसंसाधनांचा मुक्तपणे वापर करायचे.

मात्र, जंगलं वनविभागाच्या अंतर्गत गेली आणि स्थानिकांच्या वनसंसाधनं वापरण्यावर बरीच बंधनं आली. आता लोकांना ठराविक भाग सोडून जंगलात जाता येत नाही. परंतु, सरकार आणि प्रशासन मात्र, वनसंसाधनाचा अनिर्बंध वापर करताना दिसते."

BBC

"वनसंवर्धनाच्या नावाखाली विविध नियम लावले गेले परंतु, त्याच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळं स्थानिक विरुद्ध प्रशासन असा संघर्ष उभा राहिलाय, लोकांची नाराजी वाढलेली दिसते. कारण निम्म जंगल शासनानं खाणींच्या घशात घातलं, त्याचा परिणाम आमच्या भागातील पशू-पक्ष्यांसह, हवा-पाण्यातही दिसू लागलाय.

उरलेल्या भागापैकी बऱ्याचशा भागात जायला वनविभागाची बंधनं आहेत. बरं त्यातही जंगलाच्या नावाखाली सागबनचं जास्त दिसून येतं.

या सर्वांमध्ये जो इवलासा भाग वाचलाय तेच काय ते उर्वरित जंगल, पण आधीसारखं आता जंगल राहिलं कुठे? येथील लोकांच्या जगण्यावर, रोजगारावरच टाच आलीय," असंही महाका म्हणाले.

"एकीकडे सरकारच जंगलाच्या मुळावर उठलंय आणि संवर्धनाच्या नावाखाली फक्त स्थानिकांवर दबाव टाकत असेल आणि वणव्यांसंदर्भातही स्थानिकांनाच दोष दिला जात असेल तर त्याला योग्य तरी कसं म्हणायंच", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

स्थानिकांच्या या प्रश्नासंदर्भात आम्ही वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. नाईक यांच्याकडून प्रतिक्रिया आल्यानंतर ती यात अपडेट करण्यात येईल.

वणवे विरुद्ध मानवनिर्मित आग

नैसर्गिक वणवे आणि मानवनिर्मित आग यात फरक तो काय? आणि त्याचा जंगलावर काय परिणाम होतो. याबाबत आम्ही सांगलीतील नेचर कंजर्व्हेशन सोसायटीचे सह संस्थापक डॉ. हर्षद दिवेकर यांच्याशी चर्चा केली. ते मागील 16 वर्षांपासून वन्यजीव क्षेत्र आणि पर्यावरण संवर्धनावर काम करत आहेत.

दिवेकर सांगतात, "सामान्यत: नैसर्गिक वणव्यांच्या आगीत जंगलातील अनावश्यक पालापाचोळा, लाकडाच्या धडप्या, तुटलेल्या काटक्या, गवत आदि. जळून जातं, त्यामुळे निसर्गातील कार्बनचा कचरा कमी होतो. त्यामुळे भविष्यात मोठ्या आगीचा धोका टळतो, कचऱ्यातील सेंद्रिय पोषक घटक जमिनीत मिसळण्यास मदत होते. यासह, विविध प्रकारचे रोगकारक जीवाणू, विषाणूदेखील जळून गेल्यानं त्यांची वाढही नियंत्रणात राहते.

जळालेल्या भागात हवेतील आर्द्रता मिळतात बुरशीसारख्या विविध जिवाणूंची वाढ होऊन वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक वातावरण तयार होते. तसंच आधीच आग लागलेल्या ठिकाणी पुन्हा ठिणगी पेटली तरी आग पसरत नाही. तसंच जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा तिथे पुन्हा जैवविविधता निर्माण होते."

Getty Images मानवनिर्मीत आगीमुळं जैवविविधतेचं मोठं नुकसान होतं.

"परंतु, मानवनिर्मित आग याच्या अगदी उलट काम करते. समजा कोणी जंगलात फिरायला गेलं आणि तिथे त्यांच्याकडून बिडी किंवा सिगारेटचं थोटकं न विझवता फेकण्यात आलं तर ते ही आगीसाठी कारणीभूत ठरतं. किंवा वनभोजन, जंगलालगतच्या शेतात जेवण ठेवलं असेल त्यावेळी तिथे स्वयंपाक केल्यानंतर चुलीतली आग विझवली नाही तर ती देखील पेट घेत जाते," असं दिवेकर सांगतात.

दुसरा प्रकार म्हणजे मुद्दाम लावलेली आग. आपल्याकडे असा गैरसमज आहे की, मागच्यावर्षी आलेलं गवत होतं ते जाळून टाकलं की, पुढच्या वर्षी नवीन गवत जोमानं उगवेल. या गैरसमजुतीतून मुद्दाम आग लावली जाते.

परंतु, यामुळे गवतातील बऱ्याच बिया जळून खाक होतात. यामुळे नवीन गवत येण्याची नैसर्गिक साखळी नष्ट होऊन नव्याने गवत येण्याची प्रक्रियाही थांबते, असंही त्यांनी सांगितलं.

पर्यावरण आणि जैवविविधतेचं नुकसान

"मानवनिर्मित आगीमुळं पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं. या आगीमुंळं स्थानिक वनस्पती, वन्यजीव, वेली, गवत, झुडुपं आदि नष्ट होतात. यासह गवताच्या बिया, वाळलेली फळे त्यांच्या बिया ज्या पुढच्या ऋतूमध्ये रुजण्यासाठी तयार होत असतात त्यादेखील नष्ट होतात.

गवताळ जागेवर तसेच झाडा-झुडपांमध्ये असलेले विविध पक्षी-प्राणी, त्यांची अंडी होरपळून जातात. यामध्ये एखाद्या विशिष्ट ठिकाणी आढळणारी वृक्ष-वेली किंवा पशु-पक्ष्यांची विशिष्ठ प्रजाती असेल तर तिच्या अस्तित्वावरही संकट येते," असं दिवेकर सांगतात.

BBC

"वारंवार आग लागल्याने मातीच्या थरातील गुणधर्म कमी होऊन ती नापिक होते, तेथे नवीन वनस्पतींचं सृजन होऊ शकत नाही. आगीमुळं टणक झालेल्या वनजमिनीत पावसाचं पाणी मुरत नाही त्यामुळे भूजलाचं पुनर्भरण होत नाही.

वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साइडसारख्या वायुंचं उत्सर्जन होतं, जी हरितगृह वायूवाढीमध्ये भर घालतात व तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरतात," असं दिवेकर यांचं मत आहे.

Getty Images जंगलातील आगीत मानवनिर्मित आगींचं प्रमाण अधिक असल्याचं माहितीतून समोर आलं

जंगलातील विविध वृक्षांचं घटतं प्रमाण आणि व्यवसायाच्या दृष्टीनं एकाच प्रकारच्या वृक्षांची केलेली लागवड हीदेखील जैवविविधता कमी करण्यास कारणीभूत ठरते. कारण विविध प्रकारचे किट, पक्षी यांचं जीवन ठराविक वृक्ष, वेली, झुडुपांवर आधारित असतं.

अशा वृक्षांचं कमी होत जाणारं प्रमाण त्या-त्या जीवजंतुंच्या जगण्यावरही परिणाम करतं, त्यांची संख्या कमी व्हायला कारण ठरतं. व्यवसायाच्या दृष्टीनं एकाच प्रकारची वृक्ष लागवडही पर्यावरण आणि जैवविविधतेवर परिणाम करते. त्यावरही विचार होणं गरजेचं आहे, असंही दिवेकर म्हणाले.

उपाययोजना काय?

मानवनिर्मित आगींना आळा घालण्यासाठी समाजप्रबोधन करणं सर्वात महत्त्वाचं असल्याचं डॉ. दिवेकर सांगतात.

आगींमुळं जंगलाचं होणारं नुकसान, त्याचा जनजीवनावर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम याबाबत जागृती करणं गरजेचं असल्याचं दिवेकर म्हणाले.

Getty Images मिश्र वनांच्या घटत्या संख्येचाही जैवविविधतेवर परिणाम होतो

वणव्यांचा प्रसार रोखण्यासाठी वनविभागाद्वारे जाळरेषा (फायर लाईन) आखल्या जातात. परंतु, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे पुरेषा जाळरेषा आखल्या जात नाहीत, त्या रेषांची व्याप्ती वाढवल्यास वणव्यांचं वाढतं प्रमाण रोखता येईल.

यासह जंगलानजीकची गावे ज्यांनी वनसंवर्धनाच्या दृष्टीनं काही उपक्रम राबवले असतील, वणवे विझवण्यात वनविभागाला मदत केली असेल अशा गावांचा सत्कार करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या रोजगार उपलब्ध करुन देणे यामुळे स्थानिकही उत्साहानं वनविभागाला सहकार्य करतील.

वनविभागाद्वारे संयुक्त पथकाकडून गस्त घालण्यांचं प्रमाण वाढवणे, जंगलाजवळील गाव तसेच शाळा, सामाजिक संस्था यांच्या समन्वयानं विविध उपक्रम राबवून जनजागृती करणे आवश्यक आहे, असंही दिवेकर यांनी सांगितलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.