सोलापूर : सध्या शाळांमधील प्रवेशासाठी जन्म-मृत्यू दाखल्याची गरज भासत असल्याने सोलापूर महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाकडे अर्जांची गर्दी वाढू लागली आहे. १ एप्रिल ते २१ मे या काळात तब्बल आठ हजार ५०० जणांनी जन्म-मृत्यू दाखल्याबरोबरच जन्म दाखल्यातील दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत. दाखले वेळेत मिळावेत म्हणून हुतात्मा स्मृती मंदिराजवळील कार्यालयासमोर अर्जदारांची गर्दी दिसत आहे.
सोलापूर शहरातील विविध दवाखान्यांमध्ये १ एप्रिलपासून जन्मलेल्या एक हजार ९४२ बाळांच्या जन्माची नोंद करण्यासाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू कार्यालयाकडे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. याशिवाय घरी मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृत्यू दाखल्यासाठी ६०२ जणांनी अर्ज आले आहेत. तर तब्बल सहा हजार जणांनी जन्म-मृत्यू दाखल्यातील नावात, तारखेतील दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत.
पासपोर्ट काढण्यासाठी जन्म दाखल्यावरील नाव- तारीख अचूक असावी लागते. जातीचा दाखला काढताना आई-वडील किंवा आजोबांचा जातीचा दाखला पुरावा म्हणून जोडावा लागतो. त्यावेळी देखील अर्जदार व कुटुंबातील व्यक्तीच्या नावात बदल चालत नाही. या पार्श्वभूमीवर सध्या ‘नावात दुरुस्ती’चेच अर्ज अधिक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अर्ज केल्यापासून २१ दिवसांत दुरुस्ती होते तर सात दिवसांत बाळाच्या जन्माची नोंद केली जात आहे. तर मृत्यूचा दाखला ३० दिवसांत दिला जातो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
दररोज सुट्टी दिवशी पण कामकाज सुरूच
जन्म-मृत्यूच्या नोंदीसाठी २१ दिवसांत अर्ज करावा लागतो, अन्यथा काही दंड भरावा लागतो. २१ ते ३० दिवसांत दाखला मिळतो, त्यासाठी सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज ऑनलाइन करणे आवश्यक आहे. आता दीड-पावणेदोन महिन्यांत साडेआठ हजारांहून अधिक अर्ज आले असून त्याची निर्गती दररोज सुरू आहे.
- डॉ. मंजिरी कुलकर्णी, उपनिबंधक, जन्म-मृत्यू नोंदणी, सोलापूर महापालिका
ऑनलाइन अर्ज करण्याचे टप्पे...
मोबाईलमध्ये https://solapurcorporation.gov.in हे संकेतस्थळ उघडावे
संकेतस्थळ उघडल्यावर ३९ सेवा दिसतात, त्यातील दहाव्या क्रमांकावर जन्म-मृत्यू नोंदणीचा पर्याय आहे
दहाव्या क्रमांकावरील ‘बर्थ-डेथ’वर क्लिक करा, त्यानंतर जन्म-मृत्यू दाखला, नावात दुरुस्तीबद्दल माहिती येईल
जन्म-मृत्यूचा पर्याय उघडल्यावर संपूर्ण माहिती दिसेल, त्याच्या सर्वात शेवटी अर्ज भरता येईल
जन्म की मृत्यू नोंदणी करायची, दुरुस्ती करायची याचे क्रमांक आहेत, तुम्हाला जे पाहिजे त्यावर क्लिक करून अर्ज करा