आयपीएलच्या 18 व्या मोसमानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या इंग्लंड दौर्यातून टीम इंडियाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे आता टीम इंडियाला नवा टेस्ट कॅप्टन मिळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील ही पहिलीच मालिका असणार आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार? या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 24 मे रोजी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, शनिवारी दुपारी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात बैठक पार पार पडणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि हेड कोच गौतम गंभीर हे दोघे पत्रकार परिषेदला संबोधित करणार आहेत. याच पत्रकार परिषेदतून भारतीय संघाचं कर्णधाराचं नाव आणि इंग्लंड दौऱ्यासाठी खेळाडूंची नावं जाहीर केली जाणार आहेत. दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेला सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
रोहित शर्मा याने निवृत्ती जाहीर केल्यानंतर कर्णधारपदासाठी शुबमन गिल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या तिघांची नावं आघाडीवर आहेत. मात्र बुमराहने वर्कलोड मॅनजमेंटमुळे या दौऱ्यातील सर्व सामने खेळणार नसल्याचं बीसीसीआयला सांगितल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बुमराहला कॅप्टन्सी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटंल जात आहे. त्यामुळे शुबमन गिल याला नेतृत्वची सूत्र मिळण्याची अधिक शक्यता आहे.
विराट कोहली गेल्या अनेक वर्षांपासून चौथ्या स्थानी बॅटिंग करत होता. मात्र आता विराटच्या निवृत्तीनंतर चौथ्या स्थानी कोण खेळणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यर चौथ्या स्थानी खेळण्यासाठी प्रबळ दावेदार समजला जात आहे. मात्र श्रेयसला संधी मिळणार का? हा देशील प्रश्न आहे. आता या सर्व प्रश्नांची उत्तरं काही तासांतच मिळणार आहेत.
या मालिकेसाठी टीम इंडियात ऑलराउंडर शार्दूल ठाकुर आणि त्रिशतकवीर करुण नायर या दोघांचं कमबॅक होऊ शकतं. करुण नायर गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र करुणने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलच्या 18 व्या मोसमात स्वत:ला सिद्ध केलंय. त्यामुळे करुणला कमबॅकची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. करुण टीम इंडियासाठी टेस्टमध्ये वीरेंद्र सेहवाग याच्यानंतर ट्रिपल सेंच्युरी करणारा फलंदाज आहे.
तसेच शार्दूल ठाकुर देखील टीम इंडियातून अनेक महिन्यांपासून लांब आहे. शार्दूल बॉलिंगसह बॅटिंगही करतो. तसेच गेल्या काही महिन्यांत शार्दूलने उल्लेखनीय कामगिरी केलीय.त्यामुळे शार्दूलला निवड समितीकडून पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे.