टीम इंडियाचे 2 दिग्ग्ज आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी काही दिवसांच्या अंतराने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. रोहित आणि विराट या दोघांनी आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार सुरु असताना आणि कुणाच्याही ध्यानीमनी नसताना रेड बॉल क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि विराट या दोघांनीही इंस्टाग्रामवरुन निवृत्तीबाबतचा निर्णय जाहीर केला. दोघांनी इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर असा निर्णय घेतला. त्यामुळे रोहित आणि विराटवर निवृत्ती घेण्यासाठी दबाव होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता याबाबत टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच गंभीरने रोहित आणि विराटच्या निवृत्तीवरुनही प्रतिक्रिया दिली.
“मला वाटतं की खेळाची केव्हा सुरुवात करायची आणि कधी थांबायचं हा वैयक्तिक निर्णय आहे. यामध्ये कुणालाही हस्तक्षेप करायचा अधिकार नाही, मग तो सिलेक्टर असो, कोच असो किंवा नागरिक. खेळाडूला केव्हा निवृत्त व्हायचं हे कुणी सांगू शकत नाही. निवृत्तीचा निर्णय घ्यायची की नाही याबाबत अंतर्मन सांगत असतं”, असं गंभीरने एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. तसेच भविष्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुभवाची कमी जाणवेल. तसेच इतर खेळाडूंसाठी ही चांगली संधी असेल, असंही गंभीरने नमूद केलं.
“निश्चितच हे अवघड असेल. मात्र इतर खेळाडूंसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची ही चांगली संधी असणार आहे. कुणाचं नसणं हे कुणा दुसऱ्यासाठी काही तरी खास करण्याची संधी असते”, असंही गंभीरने सांगितलं.
माजी सहकाऱ्याची हिटमॅन आणि किंग कोहलीच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया
दरम्यान भारतीय क्रिकेट संघ इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सिजननंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. तसेच मालिकेसाठी 24 जून रोजी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. निवड समिती कर्णधार कुणाला करणार? या प्रश्नाचं उत्तरही चाहत्यांना मिळणार आहे.
कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी जसप्रीत बुमराह, शुबमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांची नावं चर्चेत आहेत. मात्र शुबमन गिल याला नेतृत्वाची जबाबदारी मिळण्याची अधिक शक्यता आहे. बुमराहने इंग्लंड दौऱ्यात वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सर्व 5 सामने खेळण्यासाठी सक्षम नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे शुबमनला कसोटी संघाची सूत्रं मिळण्याची शक्यता आहे.