कारंजा : तालुक्यातील काकडशिवनी येथे एका युवकाला धरणात पोहण्याचा मोह जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न समारंभात पाहूणा म्हणून आलेल्या यवतमाळ येथील युवकाला धरणात पोहण्याचा मोह झाला. गेल्या दोन दिवसांपासून मृत युवक व त्याचे सोबती पारवा कोहर येथील धरणावर पोहण्यास येत होते. २३ मे रोजी सुध्दा तीन ते चार जण पोहायला आले असता यावेळी यवतमाळ येथील रहिवासी दिनेश सावळे याचा बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश सावळे वय २७ रा.नेताजी नगर यवतमाळ येथील नावाचा युवक काकडशिवनी येथे नातलगाकडे लग्न समारंभाकरीता पाहूणा म्हणून आला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून मृत युवक व त्याचे सोबती शेजारी २ किमी अंतरावर असलेल्या पारवा कोहर येथील धरणावर पोहण्यास येत होते.
२३ मे रोजी सुध्दा तीन ते चार जण पोहायला आले असता यवतमाळ येथील रहिवासी दिनेश सावळे याला बरोबर पोहता येत नव्हते. दिनेश सावळे कमी पाण्यात पोहत असताना अचानक खोल खड्ड्यात गेला व . यावेळी दिनेशचे सोबती थोडे अंतरावर पोहत गेले असल्याने त्यांना नंतर लक्षात आले. त्यांनी शोध घेतला घेतला पण पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी गावकऱ्यांना घडलेली हकीकत सांगितली.
दरम्यान, दिनेश सावळे धरणामध्ये बुडल्याची माहिती बंडू पाटील काटोये यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख व युवा नेते कौस्तुभ डहाके यांना दिली. त्यांनी ही माहिती तात्काळ तालुक्याचे तहसीलदार कुणाल झाल्टे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांना भ्रमणध्वनीवरुन दिली. त्यांनी पिंजर येथील दिपक सदाफळे यांना कळविले असता त्यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे संत गाडगेबाबा आपात्कालीन बचाव पथक शाखा मंगरुळपिर येथील बहादुर सदस्यांना घटनास्थळी पाठविले. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.