कोल्हापूर : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही (Monsoon) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होऊन राजाराम बंधारा (Rajaram Bandhara) पाण्याखाली गेला. त्यामुळे कसबा बावडा ते वडणगे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुरक्षिततेच्या कारणास्तव या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आली. यंदा मेमध्येच राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे.
या पावसाने शेतीची कामे खोळंबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दुसऱ्या दिवशी आजही पावसाने जिल्ह्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली. यामुळे नदी, नाल्यांतील पाण्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. पंचगंगेच्या पातळीत वाढ झाली. राजाराम बंधाऱ्याची सायंकाळी पाणी पातळी १६ फूट ९ इंच इतकी झाली. यामुळे बंधारा पाण्याखाली गेला. पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले. मशागतीची कामे खोळंबली आहेत.
दरवर्षी मेचा शेवटचा आठवडा शेतजमीन तयार करण्याच्या लगबगीचा असतो. नांगरणी, बांधबंधिस्ती आदी कामात शेतकऱ्यांसह त्याचे कुटुंब व्यस्त असते. दहा-पंधरा दिवसांपूर्वी वळीव झाल्याने खरिपाच्या तयारीसाठी शेतकरी वर्ग सज्ज झाला होता; परंतु त्यानंतर सुरू झालेल्या संततधार पावसाने त्याच्या सर्व इच्छेवर पाणी पडल्याचे दिसून आले. पाऊस कधी थांबेल, हे अद्याप स्पष्ट नसल्याने सध्या बियाणे विक्री, खत विक्रीही ठप्प झाली आहे.