Bollywood Actor Passes Away:प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता काळाच्या पडद्याआड; वयाच्या ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Saam TV May 24, 2025 06:45 PM

Actor Passes Away: भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुआयामी अभिनेता आणि मॉडेल मुकुल देव यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 'दस्तक', 'सरफरोश', 'यमला पगला दीवाना' 'सन ऑफ सरदार' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यांच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

'सन ऑफ सरदार' चित्रपटात मुकुल देव यांच्यासोबत काम केलेले अभिनेते विंदू दारा सिंग यांनी अभिनेत्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याने सांगितले की मुकुल काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

दुःख व्यक्त करताना विंदू दारा सिंह म्हणाले, मुकुल आता स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहू शकणार नाही. आईवडिलांच्या निधनानंतर, मुकुल खचला होता. तो घराबाहेरही पडत नव्हता आणि कोणालाही भेटत नव्हता. मुकुल गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

यांचा जन्म १७ सप्टेंबर १९७० रोजी दिल्लीमध्ये झाला. ते मूळचे पंजाबी कुटुंबातून होते. त्यांचे बंधू राहुल देव हे देखील प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आहेत. मुकुल यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९९६ मध्ये 'दस्तक' या चित्रपटातून केली, ज्यामध्ये त्यांनी एसीपी रोहित मल्होत्रा यांची भूमिका साकारली होती. त्याच वर्षी त्यांनी 'मुमकिन' या दूरदर्शनवरील मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले.

बॉलिवूडमध्ये, तो यमला पगला दीवाना, सन ऑफ सरदार, आर... राजकुमार आणि जय हो सारख्या मोठ्या प्रकल्पांचा भाग आहे, ज्यामध्ये अनेकदा सहाय्यक पण महत्त्वाच्या भूमिकांमध्ये पाहिले जाते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी, पंजाबी, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. 'यमला पगला दीवाना' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ७ वा अमरीश पुरी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी 'फिअर फॅक्टर इंडिया' या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन देखील केले होते. अलीकडेच त्यांनी 'स्टेट ऑफ सीज: २६/११' या वेब सिरीजमध्ये झाकी-उर-रहमान लखवी याची भूमिका साकारली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.