नागपूर : ऑपरेशन सिंदूर मोहिमेदरम्यान स्वदेशी रूपाने विकसित केलेल्या ‘आकाशतीर’ हवाई सुरक्षा प्रणालीचे यश पाहता अन्य देश या प्रणालीकडे आकर्षित होऊ शकतात, असा दावा ‘डीआरडीओ’च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला.
‘आकाशतीर’ स्वयंचलित हवाई सुरक्षा नियंत्रण आणि सूचना प्रणाली असून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात ती नव्याने शस्त्र सज्जतेच्या रूपाने नावारुपास आली आहे. या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे नामशेष केली होती.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) चे प्रमुख समीर व्ही. कामत यांनी नागपूरला भेट दिली. यावेळी पीटीआयशी बोलताना सांगितले, ऑपरेशन सिंदूरच्या काळात आपल्या हवाई सुरक्षा प्रणालीने चांगले काम केले. त्यामुळे अन्य देश आकाशतीर खरेदीबाबत नक्कीच उत्सुकता दाखवतील. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर मिळवण्यासाठी भारताची वाटचाल समाधानकारक असली तरी पूर्णपणे आत्मनिर्भर होण्यासाठी आणखी काम करण्याची आवश्यकता आहे.
आगामी काळात आपण नक्कीच आत्मनिर्भर होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूर भेटीदरम्यान कामत यांनी भारताच्या विकसित होणाऱ्या संरक्षण तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल आशावाद व्यक्त केला. त्यांनी ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि रॉकेट तयार करण्यावर भर देणाऱ्या सुविधांचा दौरा केला. ‘आकाशतीर’ प्रणाली विविध रडार प्रणाली, सेन्सर्सचा वापर करत शत्रूची विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्रे शोधणे, ट्रॅक करणे आणि त्यांचा वापर करण्यास सक्षम आहे. यानुसार प्रतिकूल वातावरणातही आकाशतीर उपयुक्त ठरते.
सध्याच्या आधुनिक शस्त्रांच्या काळात पारंपरिक शस्त्रे कालबाह्य होतील का? याबाबत विचारले असता ते म्हणाले, भविष्यातील लढाई पारंपरिक उपकरणाबरोबरच नव्याने विकसित होणारे तंत्रज्ञान जसे ड्रोन यांना युद्धात सामावून घेतले जाईल. भविष्यात पारंपरिक उपकरणाबरोबरच नवीन गोष्टी देखील सामील होतील आणि आपल्याला दोन्ही गोष्टीसाठी सज्ज राहावे लागेल.
भविष्यातील संघर्षात रोबो सैनिकाची भूमिका बजावण्याची शक्यता फेटाळून लावताना म्हटले, एखादा दिवस येऊ शकतो, परंतु सध्यातरी वाटत नाही. स्वदेशी ५.५ श्रेणीतील अत्याधुनिक लढाऊ विमान ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बेट एअरक्राफ्टच्या (एएमसीए) विकासाबाबत ते म्हणाले, एएमसीए विकसित करण्याची योजना गेल्यावर्षी सुरू झाली आणि ती २०३४ पर्यंत पूर्ण होईल आणि २०३५ पर्यंत त्यास सामील केले जाईल.