रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाने कात टाकली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये गिल पर्वाचा उदय झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कसोटी कर्णधारपदी कोण असेल? याची खलबतं सुरु होती. ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या नावांची चर्चा होती. इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी बीसीसीआयपुढे नव्या कर्णधाराची घोषणा करण्याचं मोठं आव्हान होते. पण बीसीसीआयने वरील सर्व नावांना डावलून 25 वर्षीय शुबमन गिलचा विचार केला. तसेच त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत शुबमन गिलच्या नेतृत्वाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. शुबमन गिल हा टीम इंडियाचा 37वा कसोटी कर्णधार असणार आहे.
शुबमन गिलला कर्णधारपद देण्याचा निर्णय काही अचानक झालेला नाही. बीसीसीआय कर्णधारपदाची धुरा त्याच्याकडे सोपण्यापूर्वी त्याची चाचपणी करत होती. टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी शुबमन गिलकडे नेतृत्व सोपवलं. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवकडे सूत्र सोपवली आणि त्याच्याकडे उपकर्णधारपद दिलं होते. पण त्यानंतर टी20 संघाचा भाग नव्हता. वनडे क्रिकेटमध्येही त्याच्या उपकर्णधारपदाची धुरा सोपवली. चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याने उपकर्णधारपदाची जबाबदारी पेलली. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतही अनेकदा शुबमन गिल गोलंदाजांशी चर्चा करताना दिसला होता. त्यामुळे शुबमन गिलच्या कर्णधारपदासाठी एक प्रकारे मैदान तयार केलं होतं.
शुबमन गिलने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्द 26 डिसेंबर 2020 रोजी मेलबर्न कसोटीत पदार्पण केलं होतं. 32 कसोटी सामने खेळला असून त्यात 59 डावात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. यात याने 35.06 च्या सरासरीने आणि 59.93 च्या स्ट्राईक रेटने 1893 धावा केल्या आहेत. यात त्याने 5 शतकं आणि 7 अर्धशतकं ठोकली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 128 हा त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. 32 कसोटीपैकी एका डावात त्याने सात चेंडू टाकले आहेत. यात त्याने एक दाव दिली आहे. तर एकही विकेट घेतलेला नाही.
जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू आहे. पण त्याच्यासाठी वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. बुमराह प्रत्येक सामना खेळू शकत नाही. तसेच तिन्ही फॉर्मेटमध्ये गरजेनुसार खेळताना दिसेल. त्यामुळे त्याच्या अतिरिक्त भार देणं परवडणारं नव्हतं. त्यामुळे त्याच्याऐवजी शुबमन गिलच्या नावाची चर्चा झाली.
केएल राहुलही गेल्या दहा वर्षांपासून कसोटी खेळत आहे. पण कसोटी संघात त्याची जागा तयार करावी लागत होती. कधी विकेटकीपर, कधी मिडल ऑर्डर अशा पद्धतीने त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळत होती. इतकंच काय तर 101 कसोटीत त्याने 33.57 च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. ही सरासरी खूपच सामान्य आहे.
ऋषभ पंतचं नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर होतं. पण आयपीएलमधील त्याची कामगिरी त्याच्या नेतृत्वगुणात आडवी आली. त्यात भारतीय क्रिकेट थिंक टँक तिन्ही फॉर्मेटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार ठेवू इच्छित नाही. ऋषभ पंत कसोटी संघात फिट बसतो. पण व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये नाही. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार केला गेला नाही.
शुबमन गिलकडे नेतृत्व सोपवलं असलं तरी भारताची इंग्लंडमधील रेकॉर्ड काही खास नाही. भारताने 1932 पासून 2022 पर्यंत इंग्लंडमध्ये 67 कसोटी सामने खेळले आहेत. यात भारताने फक्त 9 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. तर 36 कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ भारतीय संघावर भारी पडला आहे. तर 22 कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत.
शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर आणि उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासून पुढच्या दोन वर्षांचा रोडमॅप बीसीसीआयने आखला आहे. 2027 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला जून 2025 पासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत भारताचा इंग्लंडविरुद्ध पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यापासून टीम इंडियाला विजयी टक्केवारी चांगली ठेवण्याचं आव्हान आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पर्वात टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली होती. पण दोन्ही वेळेस अंतिम फेरीत पराभव झाला. तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आणि गुणतालिकेत तिसर्या स्थानावर राहावं लागलं. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सुमार कामगिरी केल्याने विजयी टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेला फायदा झाला आणि अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरले. मात्र यंदा जेतेपद मिळवण्याच्या हेतूने बीसीसीआयने पावलं टाकली आहे.