आयपीएल 2025 स्पर्धेतील 66व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येतील. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर होणारा हा सामना पंजाब किंग्जने जिंकला तर ते पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचतील.पंजाब किंग्स जिंकला तर गुजरात टायटन्स, आरसीबी आणि मुंबई इंडियन्सला अडचणी येतील. कारण जर पंजाबने दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्धचे सामने जिंकले तर ते एकूण 21 गुणांसह पहिल्या क्वालिफायरसाठी पात्र ठरतील. पण हा सामना गमावला तर गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स आणि आरसीबीला टॉप 2 मध्ये येण्याची संधी मिळू शकते. आता फक्त मुंबई इंडियन्सचं गणित समजून घेऊयात. टॉप 3 मध्ये असलेल्या संघांनी मोक्याच्या क्षणी पराभवाचं तोंड पाहिलं तर मुंबई इंडियन्सला संधी मिळू शकते.
गुजरात टायनटन्सने आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले असून 9 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. गुजरात टायटन्स 18 गुणांसह टॉपला आहे. या स्पर्धेतील शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. हा सामना जिंकला तर 20 गुण होतील. तसेच टॉप 2 मधील स्थान पक्कं होईल. पण हा सामना गमावला तर मुंबई इंडियन्सला संधी मिळू शकते. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तर 18 गुण होतील. गुजरातच्या तुलनेत मुंबईचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे गुणतालिकेत गुजरातच्या वर असेल.
पंजाब किंग्स साखळी फेरीत आतापर्यत 12 सामने खेळली असून 8 सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. एक सामना पावासामुळे रद्द झाला. त्यामुळे प्रत्येकी एक गुण मिळाला. पंजाब किंग्स 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता साखळी फेरीत दोन सामने शिल्लक आहे. जर दिल्ली विरुद्धचा सामना जिंकला तर मुंबईची संधी जाईल. कारण 19 गुण मुंबईकडून होणारच नाहीत. पण दिल्लीविरुद्धचा सामना गमावला आणि मुंबईने शेवटच्या सामन्यात पराभूत केलं तर 18 गुणांसह टॉप 2 मध्ये जागा मिळवू शकते.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं टॉप 2 चं गणित किचकट झालं आहे. कारण 13 सामन्यापैकी 8 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव झाला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे 17 गुण आहेत. शेवटचा सामना जिंकला तर 19 गुण होतील. पण हा सामना गमावला आणि मुंबईने शेवटचा सामना जिंकला तर टॉप 2 मध्ये जाईल.
प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या चार संघांची टॉप 2 मध्ये राहण्याची धडपड का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर टॉप 2 संघांना अंतिम फेरीसाठी दोन संधी मिळतात. क्वॉलिफाय 1 मध्ये दोन्ही टॉपचे संघ भिडतात. विजयी संघ थेट अंतिम फेरी गाठतो. तर पराभूत संघ क्वॉलिफाय 2 फेरीत जातो. तिसऱ्या आणि चौथ्या संघातील विजयी संघाशी येथे लढत होते. त्यानंतर पुन्हा अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळते. त्यामुळे टॉप 2 चं गणित फ्रेंचायझींसाठी खूपच महत्त्वाचं आहे.