महाड, ता. २४ (बातमीदार) : स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर येत्या ६ जूनला तारखेनुसार व ९ जूनला तिथीनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने २८ व २९ मे या दिवशी रायगडवर जाणारा पायरीमार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यादरम्यान दोन वर्षांपूर्वी पायरी मार्गावर उंच कड्यावरून पडलेल्या दरडीमुळे एका शिवप्रेमीला आपला जीव गमवावा लागला होता. तसेच इतर छोट्या-मोठ्या झालेल्या दुर्घटना याचा सारासार विचार करून येणाऱ्या शिवप्रेमींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावरील मोठे दगड, धोंडे बाजूला करणे आवश्यक असल्याने हा बंदीचा आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जाणाऱ्या पाऊलवाटा वर सुरक्षात्मक उपाययोजना करण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या गिर्यारोहकांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्याकडून २८ व २९ मे या दोन दिवशी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान शिवप्रेमी व पर्यटकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी या दोन्ही दिवशी पायरी मार्ग पूर्णपणे बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
परिपत्रकाद्वारे सूचना
किल्ले रायगडावरील चित्त दरवाजा, नाणेदरवाजा, होळीचा माळ, शिरकाई देवी मंदिर परिसर इत्यादी ठिकाणी पोलिस बंदोबस्त राखण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकातून देण्यात आल्या आहेत. सुरक्षात्मक उपाययोजनांच्या मोहिमेदरम्यान रोपवे व्यवस्था संपूर्णपणे सुरू राहणार आहे.
......