संकटातील नर्सरी व्यवसायाची विकासाकडे वाटचाल
esakal May 25, 2025 12:45 AM

सोमाटणे, ता. २४ : कोविड महामारीच्या काळात ठप्प झालेल्या नर्सरी व्यवसायाची वाटचाल आता विकासाकडे सुरू झाली असून, पूर्वपदावर येण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे.
कोविडचा उद्रेक झाल्यानंतर २०२० मध्ये परराज्यातील मजूर आपल्या गावाकडे परतले आणि त्यामुळे नर्सरी व्यवसाय थांबला. शेतीपूरक असलेल्या या व्यवसायासाठी कामगारांची कमतरता मोठी अडचण ठरली. २०२१ मध्ये लॉकडाउनमधून सवलती मिळाल्यानंतर इतर व्यवसाय सुरू झाले, परंतु नर्सरी व्यवसायामध्ये कामगारांची कमतरता कायम राहिली. त्यामुळे नवीन रोपे तयार करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.
या काळात व्यवसायिकांना जुनी शिल्लक रोपे विकून आपला उदरनिर्वाह करावा लागला. मात्र, त्या रोपांची मागणी कमी झाल्याने ती विकली गेली नाहीत आणि आर्थिक संकट अधिकच गडद झाले. जवळपास दोन वर्षे नर्सरी व्यवसाय केवळ मुद्दलावर टिकून राहिला, नफा काही मिळाला नाही.
दरम्यान, यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्याने फळझाडांची मागणी वाढली असून, मजूर टंचाईमुळे पारंपरिक पिकांऐवजी दीर्घकालीन फळझाडांकडे त्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे आंबा, पेरू, रामफळ, फणस, चिक्कू, लिंबू, नारळ आदी फळझाडांच्या रोपांना चांगली मागणी आहे. या मागणीमुळे नर्सरी व्यवसाय आता हळूहळू नफ्याकडे वाटचाल करत आहे. परंतु अद्याप हा व्यवसाय पूर्वपदावर आला नाही. त्यामुळे या व्यवसायासाठी शासनाची मदत होण्याची व्यवसायिकांची अपेक्षा आहे.

‘‘कोविडनंतर लालमाती, खते, कीटकनाशके, प्लास्टिकच्या पिशव्या, मजुरी, कच्चा माल आदींच्या वाढलेल्या किमतीमुळे या व्यवसायाची वाटचाल कासवाच्या गतीने नफ्याकडे सुरू झाली असून, पूर्वपदावर व्यवसाय येण्यासाठी अधिक काळ लागणार आहे.
- नवनाथ मुऱ्हे, नर्सरी व्यावसायिक, सोमाटणे

PNE25V16997
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.