होमबाऊंड: अत्यंत प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवात 9 मिनिटं उभं राहून दाद द्यायला लावणारा भारतीय चित्रपट
BBC Marathi May 25, 2025 05:45 AM
Dharma Productions घायवान यांच्या होमबाऊंड या नव्या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवात नऊ मिनिटांचं स्टँडिंग ओवेशन मिळालं

एखाद्या भारतीय चित्रपटाला कान्ससारख्या अत्यंत प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षक उभं राहून तब्बल 9 मिनिटं स्टँडिंग ओवेशन देत आहेत, टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत आहेत हे दृश्य तुम्ही डोळ्यासमोर आणू शकता का. हो हे खरं आहे. चित्रपटाचं नाव आहे 'होमबाऊंड' आणि दिग्दर्शकाचं नाव आहे नीरज घायवान.

भारतीय चित्रपटकार नीरज घायवान यांनी 2010 मध्ये कान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मसान' या चित्रपटाद्वारे एक दमदार पदार्पण केलं होतं.

या चित्रपटात प्रेम, दु:ख आणि जातीव्यवस्थेच्या जाचक पकडीची एक मर्मभेदक कथा आहे. वाराणसीच्या पवित्र शहरावर ती आधारित आहे.

या चित्रपटातील प्रमुख पात्राला कर्मठ हिंदू जातीव्यवस्थेतील सर्वात खालच्या जातीपैंकी एका जातीला दिलेलं काम करताना दाखवलं आहे. ते काम म्हणजे गंगा नदीच्या काठी मृतदेहांचं दहन करणं. चित्रपटात प्रमुख भूमिका विकी कौशल या गुणी अभिनेत्यानं केली होती.

कान्स चित्रपट महोसत्वात मसान हा चित्रपट "अन सर्टन रिगार्ड" विभागात दाखवण्यात आला होता. या विभागात असामान्य शैली असलेल्या किंवा अपारंपारिक कथांची मांडणी करणाऱ्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित केलं जातं.

मसान चित्रपटानं फिप्रेस्की आणि प्रॉमिसिंग फ्युचर प्राईस म्हणून ओळखला जाणारा अवेनिर हे पुरस्कार पटकावले.

'द न्यूयॉर्क टाईम्स'मधील लेखातून सुचली कथा

तेव्हापासून, नीरज घायवान, भारतातील उपेक्षित, वंचित समुदायांवरील कथेच्या शोधात होते. 5 वर्षांपूर्वी कोरोनाचं संकट असतानाच्या काळात, त्यांचे मित्र सोमेन मिश्रा यांनी 'द न्यूयॉर्क टाईम्स' या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या 'टेकिंग अमृत होम' या लेखाबद्दल त्यांना सांगितलं.

सोमेन मिश्रा हे मुंबईतील धर्मा प्रॉडक्शन्समध्ये क्रिएटिव्ह डेव्हलपमेंटचे प्रमुख आहेत. तो लेख पत्रकार बशरत पीर यांनी लिहिला होता.

घायवान पीर यांच्या या लेखाकडे आकर्षित होण्यामागचं कारण म्हणजे, त्यात कोरोनाच्या संकटकाळात देशभरात लॉकडाऊन लागू झालेलं असताना घरी पोहोचण्यासाठी काहीवेळा शेकडो किंवा अगदी हजारो मैलांचा पायी प्रवास केलेल्या लाखो भारतीयांचा मागोवा घेण्यात आला होता.

त्याचबरोबर या लेखाच्या गाभ्याकडे देखील ते आकर्षित झाले. त्यात दोन पुरुषांच्या बालपणीच्या मैत्रीवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. त्यातील एक मुस्लिम होता आणि दुसरा दलित (पूर्वी अस्पृश्य म्हणून ओळखले जाणारे) होता.

Dharma Productions बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली आहे

घायवान यांच्या या नव्या चित्रपटाचं नाव आहे 'होमबाऊंड'. पीर यांच्या लेखातून प्रेरित होऊन तो तयार करण्यात आला. या आठवड्यात हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात 'अन सर्टन रिगार्ड' या विभागात दाखवण्यात आला.

अश्रू, कौतुक आणि टाळ्यांचा न थांबणारा कडकडाट

चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांनी तब्बल 9 मिनिटं उभं राहून टाळ्यांचा कडकडाट करून या चित्रपटाचं कौतुक केलं.

चित्रपटाचा प्रभाव इतका जबरदस्त होता की, प्रेक्षकांमधील अनेकजण अश्रू पुसत होते. त्यानंतर घायवान यांनी चित्रपटाचा मुख्य निर्माता करण जोहरला घट्ट मिठी मारली. तर नंतर घायवान आणि इशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर या त्यांच्या तरुण प्रमुख कलाकारांनी एकत्र येऊन एकमेकांना मिठी मारली.

कान्स 2025 महोत्सवात हा सर्वात मोठा दक्षिण आशियाई कार्यक्रम होता. त्यामुळे साहजिकच यात सादर होणाऱ्या चित्रपटांसाठी चित्रपट क्षेत्रातील इतर दिग्गजांनीदेखील हजेरी लावली.

प्रसिद्ध चित्रपटकार मीरा नायर यांनी चित्रपटगृहातील दोन रांगांमधून पुढे होत करण जोहरचं अभिनंदन केलं. मीरा नायर यांना 1988 मध्ये सलाम बॉम्बे या चित्रपटासाठी कॅमेरा डी'ऑर मिळाला होता.

पाकिस्तानच्या सियाम सादिक यांनी चित्रपटगृहातील वातावरण, मूड यांचं रील बनवून ते नंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं. सियाम सादिक यांना 2022 मध्ये साठी 'अन सर्टन रिगार्ड ज्युरी' पुरस्कार मिळाला होता.

X/@DharmaMovies

या चित्रपटाचं अनपेक्षित प्रेक्षकवर्गाकडून देखील कौतुक झालं आहे. चित्रपटाचे प्रमुख निर्माते करण जोहर आहेत. करण जोहर भारतीय व्यावसायिक चित्रपटातील आघाडीचे निर्माते म्हणून प्रसिद्ध आहेत.

करण जोहर आणि अलीकडेच प्रदर्शित झालेल्या या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखले जातात.

मात्र गेल्या महिन्यात मार्टिन स्कॉर्सेस यांना मेलिता टोस्कन डू प्लँटियर या फ्रेंच चित्रपट निर्मात्यानं या क्षेत्रात आणल्यानंतर कार्यकारी निर्माता म्हणून पदार्पण केलं.

समकालीन भारतीय चित्रपटांच्या निर्मितीत सहभागी होण्यासाठी स्कॉर्सेस यांनी पहिल्यांदाच पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत त्यांनी जुन्या क्लासिक भारतीय चित्रपटांचं पुर्नसंचय करण्यासाठी किंवा त्यांना नवं स्वरुप देण्यासाठीच रस घेतला आहे.

स्कॉर्सेस गेल्या महिन्यात म्हणाले होते, "2015 मध्ये मी नीरज यांचा 'मसान' हा पहिला चित्रपट पाहिला होता. मला तो खूप आवडला होता. त्यामुळे मेलिता टोस्कन डू प्लँटियर यांनी जेव्हा मला त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाचा प्रोजेक्ट पाठवला तेव्हा मी खूपच उत्सुक होतो."

ते पुढे म्हणाले, "मला चित्रपटाची कथा, त्यातील संस्कृती खूपच आवडली. त्यामुळे चित्रपटाला मदत करण्यासाठी मी तयार होतो. नीरज यांनी खूपच सुंदर चित्रपट बनवला आहे. हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठीचं महत्त्वाचं योगदान आहे."

घायवान यांच्या मते, स्वॉर्सेस यांनी चित्रपटाच्या टीमला उत्तम चित्रपट बनवण्यास मदत केली. त्यांनी अनेक वेळा संपादनात मार्गदर्शन करून चित्रपटाला योग्य स्वरूप देण्यात मोलाची भूमिका बजावली.

त्यांनी या चित्रपटाच्या कथेच्या संदर्भात सांस्कृतिक संदर्भ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मितीत विचारांची देवाणघेवाण होण्यास मदत झाली.

चित्रपटाची कथा आणि वैयक्तिक आयुष्यातील दु:खाची बोच

या चित्रपटाच्या कथेचा संदर्भ घायवान यांच्यासाठी महत्त्वाचा होता. कारण ते जो विषय हाताळत होते, त्याचा योग्य आशय, विषयाचा आत्मा चित्रपटात आणण्याचा प्रयत्न ते करत होते.

चित्रपटात दोन प्रमुख पात्रं आहेत. ती म्हणजे मोहम्मद शोएब अली आणि चंदन कुमार. मोहम्मदची भूमिका इशान खट्टरनं केली आहे तर चंदन कुमारची भूमिका विशाल जेठवानं केली आहे. या दोन्ही पात्रांचा सामाईक इतिहास आहे.

तो म्हणजे उच्च जातीय हिंदूंकडून शतकानुशतकं सहन करावा लागलेला भेदभाव. मात्र त्यांच्या लादलेल्या अडथळ्यांवर मात करून आयुष्यात पुढे जाण्याचं त्यांचं ध्येय देखील समान आहे. या दोघांनाही राज्याच्या पोलीस दलात भरती व्हायचं आहे.

घायवान यांनी उघडपणे सांगितलं आहे की, त्यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला होता. या वास्तवाचा त्यांच्या आयुष्यावर दीर्घकाळ प्रभाव पडला आहे. त्यांच्या लहानपणापासून हे वास्तव त्यांना सतावतं आहे.

मोठं झाल्यावर, घायवान यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण घेतलं आणि नंतर दिल्लीजवळ गुडगावमध्ये एक कॉर्पोरेट नोकरी केली. ते म्हणाले की, त्यांना कधीही भेदभावाला तोंड द्यावं लागलं नाही.

मात्र जातीव्यवस्थेतील त्यांच्या स्थानाची त्यांना पूर्ण जाणीव होती. अजूनही ते ज्या जातीत जन्मले त्याचं जातीव्यवस्थेत असणाऱ्या स्थानाचं ओझं घेऊनच जगत आहेत.

"हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कॅमेऱ्याच्या मागे आणि समोर असलेला या समुदायातील मी एकमेव मान्यताप्राप्त किंवा कौतुक झालेला व्यक्ती आहे. आपण अशा प्रचंड दरीनिशी जगत आहोत," असं ते म्हणतात.

Dharma Productions चित्रपटात दोन पुरुषांच्या मैत्रीची कथा आहे, इशान खट्टर आणि विशाल जेठवानं ही पात्र रंगवली आहेत

भारतातील बहुसंख्य लोक ग्रामीण भागात, खेड्यांमध्ये राहतात. मात्र हिंदी चित्रपट निर्माते क्वचितच त्यांच्या चित्रपटांच्या कथांमध्ये गावांची मांडणी करण्याबद्दल बोलतात किंवा त्यांच्या चित्रपटात गावांवर आधारित कथा क्वचितच दिसतात, असं घायवान म्हणतात.

वंचित किंवा उपेक्षित समुदायाबद्दल फक्त आकडेवारीच्या दृष्टकोनातून बोललं जातं, त्यांची दखल फक्त आकड्यांमध्येच घेतली जाते ही गोष्ट देखील घायवान यांना बोचते.

घायवान पुढे म्हणतात, "या आकडेवारीपलीकडे जर आपण एखाद्या व्यक्तीची निवड केली किंवा एखादं पात्र सादर केलं आणि त्यांच्या आयुष्यात काय घडलं हे पाहिलं तर? ते या टप्प्यावर कसे पोहोचले? ही बाब चित्रपटाच्या कथेत मांडणी करण्यायोग्य आहे असं मला वाटलं."

जेव्हा ते चित्रपटाची पटकथा लिहू लागले तेव्हा त्यांनी चित्रपटातील ही दोन प्रमुख पात्रं कोरोनाच्या संकटादरम्यान प्रवास करण्यास सुरू करेपर्यंतच्या त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल काल्पनिक मांडणी करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या संकटकाळातील प्रवास ही पीर यांच्या लेखाची सुरुवात आहे.

हैदराबादमध्ये बालपणी, घायवान यांचा एक जवळचा मित्र होता, तो मुस्लिम होता. त्याचं नाव असगर होतं. त्यामुळेच चित्रपटातील अली आणि कुमार यांच्या आयुष्यातील अनुभवांशी ते खोलवर जोडले गेले होते.

"यात मला सर्वाधिक आवडलेली बाब म्हणजे त्यामागील माणुसकी, परस्परसंबंध, नात्यातील अंतर्गत भावानुबंध," असं ते म्हणतात. या सर्व गोष्टी त्यांना हैदराबादमधील त्यांच्या बालपणात पुन्हा घेऊन गेल्या.

अंतर्मुख करणारा आशयसंपन्न चित्रपट

घायवान यांच्या मांडणीत आणि हाताळणीत होमबाऊंड चित्रपटात हिवाळ्यातील मोहक सूर्यकिरणांची चमक आणि उबदारपणा आहे. उत्तर भारतातील ग्रामीण भागात चित्रपटाचं सुंदर चित्रीकरण करण्यात आलं आहे.

त्यात मुस्लिम आणि दलित नायकांचा साधासरळ आनंद आणि दैनंदिन संघर्ष उत्तमरितीनं टिपण्यात आला आहे.

चित्रपटातील दोन पुरुष, एक महिला पात्र ज्यावर त्यातील एकजण प्रेम करतो (विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर या दोघांनीही ही दलित पात्रं साकारली आहेत) आणि त्यांच्या संवादातून खोलवर विचार करण्यासारखं आणि समजण्यासारखं बरंच काही गवसतं.

चित्रपटातील घायवान यांची पटकथा बहुतांश वेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवते. 2019 मध्ये आपल्यापैकी कोणालाही कोरोना संकटाच्या व्याप्तीची जाणीव किंवा आकलन झालं नव्हतं. मात्र हा चित्रपट आपल्याला सूक्ष्मपणे एका बदलाचा संकेत देतो.

चित्रपट आपल्याला जाणीव करून देतो की, एखादं संकट सर्व वर्ग, जात आणि वांशिकतेला छेद देत सर्वांनाच स्पर्श करू शकतो.

Dharma Productions होमबाऊंडमधील काल्पनिक आणि वास्तवाच्या प्रवाही मिश्रणातून एक शक्तीशाली सार्वजनिक दस्तावेज निर्माण झाला आहे

होमबाऊंड चित्रपटातील काल्पनिक आणि वास्तवतेच्या प्रवाही मिश्रणातून एक जबरदस्त, शक्तीशाली सार्वजनिक दस्तावेज तयार केला आहे. चित्रपट त्याच्या पात्रांना प्रामाणिकपणानं सादर करतो.

प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणण्यापलीकडे, हा चित्रपट अर्थपूर्ण संभाषणांना, विचारांना चालना देईल. उपेक्षित, वंचित समुदायातील लोकांच्या आयुष्याबद्दलची एक सखोल समज हा चित्रपट निर्माण करेल, अशी आशा आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.