पहिली माझी ओवी गं...
esakal May 25, 2025 11:45 AM

ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com

बिलाच्या रांगेत उभं असताना अनेकांच्या बास्केट आणि ट्राॅलीमध्ये दर्जेदार उत्पादनांची तयार पीठं दिसत होती. यामुळे अनेकांची सोय होते खरी. दळण टाकायला गिरणीत जाणं हे एक वेगळं काम मग रहात नाही. अर्थात ज्यांना शक्य असतं किंवा आवश्यक वाटतं ते आजही गिरणीत जातात; पण घरोघरी भल्या पहाटे नित्यनेमाने होणारी ती जात्याची घरघर आणि त्या लयीत गायली जाणारी जात्यावरची ओवीही थांबली. असलीच तरी कमी प्रमाणात.

आजी-पणजी यांना पूर्वी अनेक ओव्या त्यांच्या आई-आजी-पणजीमुळे ठाऊक होत्या. ही एक मौखिक परंपराच. पूर्वीच्या काळी कधी शाळेत न गेलेली स्त्री. तिचं चूल नि मूल एवढंच भावविश्व. दिनक्रमसुद्धा ठरलेला. सूर्य जसा नित्यनेमानं उगवतो, तसंच हिचं दळणाचं काम. कधी न चुकणारं. अगदी रोजचंच. रोजचं हे अवघड काम हलकं व्हायचं ते शब्दसूरांच्या साथीनं. एका ओवीतून ती व्यक्त होते -

साऱ्या गं कामामध्ये दळण अवघड

गाण्याच्या नादामध्ये बाई ओढिते दगड

त्या काळच्या स्त्रिया तर निरक्षर होत्या, मात्र आपलं भाग्य इतकं थोर, की सरोजिनी बाबर, साने गुरुजी, इंदिरा संत यांच्यासारख्या थोर साहित्यिक-अभ्यासकांनी हा अनमोल ठेवा महत्प्रयासाने संकलित करून ग्रंथरूपाने प्रकाशात आणला आणि त्या पुस्तकांच्या पानापानावरच्या शब्दचित्रातून तो काळ आपल्या डोळ्यासमोर अक्षरश: उभा राहतो.

चूल आणि मूल एवढंच विश्व होतं, तरी विषय मात्र अनेक होते. सासर-माहेरची नाती, सूर्यनारायण, तुळस, भक्ती.. असे कितीतरी. हे जात्यावरचं गाणं म्हणजे जणू तिच्या मनाचं, जगण्याचं प्रतिबिंबच होतं. तिचे कडूगोड अनुभव, आठवणी, कल्पना, चिंतन हे सगळंच त्यात दिसतं. कधी तिची अफाट निरीक्षणशक्ती दिसते, तर कधी चपखल उपमा स्पर्शून जाते. ही ओवी पहा-

समुद्रा रे बापा किती करिशी बढाई

नाही पाण्याला गोडाई तिळमात्र

समुद्राच्या उंचच उंच लाटा पाहून तिला हे सुचलं असावं. बढाईखोर माणसाच्या वृत्तीची तिला आठवण होते. जरा म्हणून गोडी नसताना इतक्या कसल्या बढाया माराव्या समुद्राने. आपणही पाहतोच की समुद्र; पण हिने जणू सुभाषितकाराच्या दृष्टीतून त्याच्याकडे पाहिलंय आणि खरोखरीच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोकच आजही बढाया मारताना दिसतात; पण खरे गुण असतील, तर न सांगताही पारख होतेच.

आता मी जरी ‘ती’ असं म्हणतेय, ‘तिला’ वाटतं असं लिहीत असले, तरी ती एकच स्त्री नव्हे, तर वेगवेगळ्या स्त्रियांना, वेगवेगळ्या काळी, वेगवेगळ्या गावी या सुचलेल्या ओव्या आहेत, मात्र विचारांची, कल्पनांची झेप विलक्षण आहे हे नक्की. असंच अगदी एक रोजच्या जगण्यातलं एक उदाहरण. विषय काय तर भांडे.

वरुनी आरशाचे आत परी भांडे काळे

सर्वच जीवांचे आत बाहेर निराळे

आहे ना चपखल! अगदी आजही लागू होईल अशी माणसाच्या वृत्तीवर नेमकं भाष्य करणारी ही ओवी. पोटात एक ओठात एक किंवा खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे अशा म्हणींची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

कधी सुभाषितांची, कधी म्हणींची, तर कधी थेट संतवचनांची आठवण या ओव्या करून देतात.

जो जो प्राणी आला माऊलीच्या पोटी

धरित्रीच्या पोटी तो तो जाई

वाचताक्षणी ‘उपजे ते नाशे’ हे माऊलींचे शब्द आठवतात. आणि म्हणूनच मरणाचं स्मरण ठेवत अगदी सोप्या शब्दात एक ओवी काय शिकवण देते पहा-

वेळी सारवावे वेळीच शिवावे

हा गं देह आहे तोच सार्थक करावे

आपली नित्यकर्म वेळीच करणं यातच आयुष्याची सार्थकता आहे. गहन वाटणारा विचार किती सोपा झाला पहा.

आता हे वरवर सोपं वाटत असलं, तरी त्यामध्ये अडथळा असतो तो आपल्याच मनाचा. त्याबद्दलही तिने किती सहजसुंदर सांगितलं -

चूल सारविती जशी नित्य गं नेमाने

तसे मन हे भक्तीने सारवावे

जसं, अंधार नाहीसा करायला काही खोडरबर लागत नाही. प्रकाश आला, की अंधार नाहीसा होतोच. तसंच मनामध्ये भक्तिभाव निर्माण झाला किंवा सद्विचारांना जागा दिली, की वाईट विचार शिवतच नाहीत; पण यासाठीही सातत्य हवं असं ही ओवी सांगते. माइंड स्पा किंवा माइंड जिम हे शब्द आधुनिक वाटले, तरी तो विचार तिने केव्हाच करून ठेवलाय. आणि ही मालन जे जे सांगते ना, ते ते तिचं जगणं आहे. कामं करता करताच तिच्या प्रतिभेला पंख फुटतात. प्रत्येक गोष्टीकडे ती वेगळ्याच दृष्टीने पाहते. अगदी सूर्यनारायण, गाय, तुळस तिच्या दिनचर्येचा भाग आहेत. ओवीमध्ये कुंकू, सौभाग्यलेणी यांचा उल्लेख तर स्वाभाविकच; पण विशेष म्हणजे सूर्यदर्शन घेतानाही त्याच्या लाल आणि गोल बिंबातही ती आपलं कुंकूच पाहते. इतकं ते अनमोल आहे.

उगवला नारायीन तांबडी तेची काया

लाडकी माझी सया कुक्कू मागती गं लेया

सूर्यनारायण तिच्या असंख्य ओव्यांमधून उगवला आहे, उजळला आहे. तशीच तुळसही तिच्या ओवीत जागोजागी डोलते. तुळशी वृंदावन आणि गुरांचा गोठा हा तर प्रत्येकच घराचा जणू अविभाज्य भाग होता. तसंच आधी म्हटल्याप्रमाणे तिच्या दिनचर्येचाही.

सकाळी उठून बाई तोंड पहावं गाईचं

अंगणात वृंदावनी तुळसबाईचं

सगळी नित्यकर्म मनोभावे करतानाही तिच्या मनाचा झोका सासरी-माहेरी असा झुलत रहातो. आजही मुलीसाठी माहेर हा हळवा कोपरा असतोच. पण आज प्रवासाच्या, संपर्काच्या अनेक सोई आहेत; पण पूर्वी लहान वयात लग्न झाल्यावर, संपर्क सहज शक्य नसताना आणि माहेरी जाण्यासाठी अवलंबून असताना त्या काळची तिची माहेरची ओढ अधिक तीव्र असणं साहजिक आहे. एका ओवीत फार सुंदर वर्णन वाचलं होतं.

कंथ पुशित्यात रानी माहेरवास कसा

केळीच्या पानावर आंबेमोहोर भात जसा

कंथ म्हणजे नवरा बरं का. माहेरी आई-वडील, बहिणी, भाऊ-भावजय सगळेच असतात. मोठं कुटुंब! सर्वांवर ओव्या आहेतच; पण आई विशेष जवळची. शाळेत न गेलेली मालन तिची ही भावना किती स्पर्शून जाते पहा.

मी तं शिकलेली बयाबाईच्या साळला

काम करावं गं सदा येळच्या येळंला

आईचा उल्लेख ठिकठिकाणी बयाबाई म्हणून केलेला दिसतो. अर्थात त्याच ओव्या थोड्या वेगळ्या शब्दातही कधी दिसतात. ग्रामीण, शहरीही असतात. मौखिक परंपरा. त्यामुळे असा पाठभेद स्वाभाविक वाटतो. माहेरी जाणं सतत होत नसल्याने आपलं मन ती मोकळं करते ते जात्याजवळ. त्यालाही ती देवासमान मानते. चराचरात देव पहाणं ही तर आपल्या संस्कृतीची आणि प्राचीन ग्रंथांचीही शिकवण. ती म्हणते -

जात्या तू ईसवरा कुण्या डोंगराचा ऋषी

खोलते मी तुझ्यापाशी माझ्या हुरुदाच्या राशी

मालनीचं हे शब्दधन, विचारधन वाचताना, त्याबद्दल लिहिताना आणि अर्थातच सादरीकरण करताना नेहमीच निखळ आनंद मिळतो. कधी अंतर्मुखही व्हायला होतं आणि हा ठेवा न सरणारा आहे. तिच्या जात्यावरच्या दळणासारखा आणि हे शब्दही जणू मोती पोवळ्याच्या राशीच आहेत अगदी या ओवीसारख्या -

सरले दळण सरले म्हणू कशी

सासरी माहेरी मोती पवळ्याच्या राशी

आज जात्याची घरघर थांबली आणि इंदिराबाई लिहितात त्याप्रमाणे ही ओवी जात्यावरच उमलत असली, तरी तिचा गंध आजही दरवळतोय. हा कस्तुरीगंध मनाच्या कुपीत जपतच समारोप करते या ओवीने

राम राम म्हणा राम साखरेचा खडा

रामाचे नाव घेता दिस आनंदात जावा

(लेखिका निवेदिका आणि व्याख्यात्या आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.