सोलापूर : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी (ता. २३) विजापूर रस्त्यावरील अत्तार कॉम्प्लेक्समधील माया फॅमिली स्पा सेंटरवर छापा टाकून मसाजच्या नावाखाली सुरू असलेला बेकायदा देहविक्रय उघडकीस आणला. तेथे चार पीडित महिला आढळून आल्या. याप्रकरणी स्पा सेंटरच्या चालकासह मालकाविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चालकास अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
विशाल चंद्रकांत धोत्रे (वय ३२, रा. नुराणी मशिदीच्या मागे, झोपडपट्टी नंबर एक, जुना विजापूर नाका, सोलापूर) असे पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार अकिला युसुफ नदाफ यांनी फिर्याद दिली आहे. माया फॅमिली स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्रय सुरू असल्याची खबर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी पोलिसांनी ही कारवाई केली. तेथे चार महिलांकडून मसाज व देहविक्रय करून घेण्यात येत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन महिलागृहात पाठवले. तर चालक विशाल धोत्रे याला अटक केली. त्याला शनिवारी (ता. २४) न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर, हेडकॉन्स्टेबल महादेव बंडगर, अकिला नदाफ, सुशिला नागरगोजे, नफिसा मुजावर, सुजाता जाधव, सीमा खोगरे, उषा मळगे, शैलेश बुगड, दादा गोरे यांनी ही कारवाई केली.
महिला दिल्ली, वाराणशीच्याया कारवाईत चार पीडित महिला आढळल्या. त्यांना महिलागृहात पाठवण्यात आले आहे. त्या दिल्ली, वाराणशीच्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अशाप्रकारे मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाची नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांनी केले आहे.
अत्तार कॉम्प्लेक्समधील नोबेल हाऊस या दुसऱ्या मजल्यावर माया फॅमिली स्पा सेंटर चालवला जात होता. पोलिस तेथे पोचले असता स्पा सेंटरचालकाने पोलिस इमारतीत येऊ नयेत, यासाठी लिफ्ट व जिन्याचे लोखंडी गेट कुलूप लावून बंद केले होते. पोलिसांनी शेजारच्या इमारतीतील लोखंडी मिळवली. त्याद्वारे ते पहिल्या मजल्यावर व तेथून दुसऱ्या मजल्यावरील स्पा सेंटरमध्ये पोचले. तेथे पीडित महिलांकडून मसाज व देहविक्रय करून घेतले जात होते.