तुर्की बनावटीच्या पाणी बचाव मशीनचे कंत्राट रद्द करा
- शिवसेना ठाकरे गटाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : भारत-पाकिस्तानदरम्यान चिघळलेल्या परिस्थितीत तुर्कीने पाकिस्तानची बाजू घेत पाठिंबा दिला. त्यामुळे मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर बसवण्यात येणाऱ्या तुर्की बनावटीच्या रोबोटिक पाणी बचाव मशीनचे कंत्राट रद्द करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी माहिती देताना सांगितले की, नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्याच्या निषेधार्थ भारत सरकारने तुर्कीशी सर्व व्यापारी संबंध तोडून त्यांच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला, परंतु मुंबई महापालिकेने एका भारतीय कंपनीच्या माध्यमातून मुंबईतील सहा चौपाट्यांवर बसवण्यात येणाऱ्या तुर्की बनावटीच्या रोबोटिक पाणी बचाव मशीन तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत सरकारने तुर्कीच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकला असताना मुंबई महापालिकेने तुर्की बनावटीच्या मशीन तैनात करण्याचा घेतलेला हा निर्णय अनाकलनीय आहे, असे ठाकरे गटाचे म्हणणे असून, त्यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र लिहीले आहे. पालिका प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा पडवळ यांनी दिला आहे.