कृषी समितीच्या जमिनीची विक्री
भूसंपादन विशेष अधिकारी यांचे चौकशीचे आदेश
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीला शासनाने मुदत वाढ दिल्यानंतर या कालावधीत कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, तसेच अपवादात्मक परिस्थितीत धोरणात्मक निर्णय घेतल्यास सरकारची मान्यता घ्यावी, असे आदेशित केले होते; मात्र कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव व माजी सभापतींनी पणन संचालकाची मजुरी न घेता बेकायदा ठराव करून जमीन व टेरेसची विक्री केल्याने याबाबत सखोल चौकशी करावी, तसेच संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी रवी गायकवाड यांनी पणन संचालक, उपसचिव सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्याकडे केली आहे. तसेच संबंधितावर गुन्हे दाखल न केल्यास शांततेच्या मार्गाने पणन संचालक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ २१ एप्रिल २०२४ रोजी संपुष्टात आला होता. कार्यकाळ संपल्यानंतर पहिली मुदतवाढ सहा महिन्यांसाठी २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर २१ एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय एगडे यांनी बेकायदा सभा बोलवून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खुल्या जागेसंदर्भात न्यायालयीन कार्यवाही चालू असतानाही त्या संबंधित ठराव केला. तसेच पणन संचालक, महाराष्ट्र, पुणे व सरकारची कोणतीही परवानगी न घेता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती कपिल थळे यांनी ठराव पारित केला व जमीन सर्व्हे नं. २९०/२ अंजली संत व इतरांना दिली.
इमारतीचे टेरेस हेसुद्धा कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या मर्जीतील व्यक्तींना दिल्याचा आरोप तक्रारदार रवी गायकवाड यांनी केला आहे. तसेच माहिती अधिकारातून याबाबत माहिती मिळविल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी भूसंपादन विशेष अधिकारी (विशेष घटक) जिल्हाधिकारी ठाणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सखोल चौकशी करावी व अहवाल सादर करण्याच्या सूचना उपनिबंधक कल्याण यांना दिल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.