चमकले दोन तारे!
esakal May 25, 2025 11:45 AM

शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com

अनेक खेळाडूंनी आयपीएलचे एक-दोन मोसम गाजवले; परंतु नंतर धुमकेतूसारखे गायब झाले आहेत. वैभव आणि आयुष यांची गुणवत्ता मात्र इतरांपेक्षा वेगळी आहे. आत्ता आयपीएलमुळे या दोन ताऱ्यांचे तेज दिसून आले; पण त्याअगोदरही या दोघांनी आपल्या गुणवत्तेची आणि क्षमतेची चुणूक दाखवलेली आहे. आयुष तर मुंबईच्या रणजी संघातूनही खेळलेला आहे. यंदाची आयपीएल ही त्यांच्यासाठी पुढची पायरी ठरली.

आयपीएल अंतिम टप्प्यात आली. प्लेऑफचे चारही संघ कधीच निश्चित झाले आणि उरलेल्या सहा संघांचे आव्हान त्याच वेळी संपुष्टात आले. या आयपीएलमधून काय मिळाले आणि काय गमावले याचे विश्लेषण प्रत्येक संघ करेल आणि पुढची तयारी सुरू होईल; पण भारतासाठी या आयपीएलमधून काय मिळाले? हा विचार केला जाईल तेव्हा वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांची नावे प्राधान्याने पुढे येतात. यातील एक आहे १४ तर दुसरा १७ वर्षांचा. इतक्या लहान वयात आयपीएलसारख्या सर्वात मोठ्या व्यासपीठावर होणारा हा सूर्योदय निश्चितच भारतीय क्रिकेटची पालेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे सिद्ध करणार आहे.

कधी काळी मुंबई, चेन्नई, बंगळूर, दिल्ली, कोलकाता अशा महानगरातून खेळाडू, क्रिकेटपटू तयार व्हायचे, कारण तशा सुविधा या महानगरांत होत्या. आता मात्र काळ बदलला. झारखंडमधून महेंद्रसिंग धोनीसारखा महान खेळाडू तयार झाला. आता त्याच बिहारमधून वयाच्या १४ वर्षीयचे ‘वैभव’ दिसून आले. मुंबई ही भारताची क्रिकेट पंढरी; पण प्रत्यक्ष मुंबई शहरापासून बऱ्यापैकी अंतरावर असलेल्या विरारमधून ‘आयुष’ घडत आहे. बारकाईने विचार करायचा म्हटला तर असे आश्चर्यकारक गुणवत्ता असलेले असे अनेक खेळाडू देशभरातील ग्रामीण भागातूनही निर्माण होत आहेत. यातून एक गोष्ट निश्चित की, इथली जमीन क्रिकेटसाठी पोषक झालीय. बियाणं टाका, त्याचे संगोपन करा भरभरून पीक तयार होईल, अशी भारतीय क्रिकेटची परंपरा तयार होतेय. अर्थात याला सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा अशा नायकांनी तयार केलेले वातावरणही तेवढेच कारणीभूत आहे; पण सुपीक जमीन, कसदार बियाणं आणि त्याला आवश्यक असलेले उत्तम हमावान असले तरी येणाऱ्या पिकाचे उत्तमपणे संगोपन केले तरच अत्यंत पोष्टिक असे धनधान्य मिळते. तसेच सध्याच्या भारतीय क्रिकेटबाबतही म्हणता येईल.

तयार होणाऱ्या नव्या पिढीचे आता सर्वार्थाने चांगले संगोपन होणे गरजचे आहे. हे संगोपन केवळ त्यांना उत्तमोत्तम संधी देणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, कारण सध्याच्या या आधुनिक युगात विविध प्रलोभनांची कीड या पिकांना कधी लागेल याचा नेम नाही. म्हणूनच आत्तापासूनच ‘जंतूनाशक’ फवारणी आवश्यक आहे.

वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांची सध्या जोरदार चर्चा आहे. हे खेळाडू लवकरच मुख्य भारतीय संघात असतील, असा अंदाज माजी खेळाडू ठामपणे वर्तवत आहेत. याचा अर्थ या दोघांकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची क्षमता आहे. आयपीएलमध्ये केवळ एक-दोन सामन्यांत नेत्रदीपक फटकेबाजी केली म्हणजे कोणी स्टार होत नाही. अनेक खेळाडूंनी आयपीएलचा एक-दोन मोसम गाजवले; परंतु नंतर धुमकेतूसारखे गायब झाले आहेत. वैभव आणि आयुष यांची गुणवत्ता मात्र इतरांपेक्षा वेगळी आहे. आत्ता आयपीएलमुळे या दोन ताऱ्यांचे तेज दिसून आले; पण त्याअगोदरही या दोघांनी आपल्या गुणवत्तेची आणि क्षमतेची चुणूक दाखवलेली आहे. आयुष तर मुंबईच्या रणजी संघातूनही खेळलेला आहे. यंदाची आयपीएल ही त्यांच्यासाठी पुढची पायरी ठरली. बीसीसीआयने १९ वर्षांखालील इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघाचे नेतृत्व आयुषकडे दिले, तर वैभव या संघाचा महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. इंग्लंड दौरा ही त्यांच्यासाठी आणखी पुढची मोठी संधी आहे. याच वेळी मुख्य भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोण जाणे गरज लागली तर यापैकी एकाला कसोटीत खेळण्याची संधी मिळू शकते; पण तो नंतरचा भाग.

अशा नवोदित खेळाडूंना भविष्य खुणावत असल्याची जाणीव होत असते, तेव्हा त्यांचे पाय जमिनीवर ठेवणाऱ्या गुरुचीही तेवढीच गरज असते. एक छोटे उदाहरण पाहू या. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ वर्षांखाली विश्वकरंडक जिंकला, त्या संघात शुभमन गिल होता. आता पृथ्वी शॉ कोठेय आणि गिल कुठे आहे? गिलच्या अगोदर पृथ्वी शॉने कसोटी पदार्पण केले होते. पदार्पणात शतकही केले होते, पण...? म्हणूनच योग्य वेळी आणि सातत्याने होणारी ‘जंतूनाशक फवारणी’ गरजीची असते. आयुष आणि वैभवच्या बाबतीत योगायोगाने का होईना पण एक गोष्ट चांगली घडली. महेंद्रसिंग धोनी सर्वेसर्वा असलेल्या चेन्नई संघाचा आयुष सदस्य झाला आणि वैभव ज्या राजस्थान संघातून खेळतोय, त्या संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत. धोनीचा केवळ खेळ नव्हे, तर त्याचे वागणे, विचार करण्याची क्षमता हे आयुषला जवळून पाहता आले. राहुल द्रविड तर सर्वार्थाने महागुरू आहेत. सध्या प्रगतिपथावर असलेले अनेक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहेत; पण शेवटी स्वतः खतपाणी मिळाल्यानंतर वेलीने कोणता आधार घेत पुढे जायचे, हे त्याचे त्याने ठरवायचे असते. पृथ्वी शॉने १९ वर्षांखालील विश्वकरंडक जिंकला, त्या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड होते. ईशान किशन जेव्हा १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा कर्णधार होता, त्यावेळीही राहुल द्रविडच प्रशिक्षक होते.

माध्यमांची भूमिका महत्त्वाची

एखाद्याला मोठे करण्यात किंवा खाली आणण्यात आज काल प्रसिद्धी माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची ठरत असते. एखादा खेळाडू चमकला की त्याच्या मागे धावत असतात. सोशल मीडिया तर कधी कधी मर्यादा ओलांडत असतात. एक फार जुना प्रसंग आहे. अनेक वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्तरावर शालेय क्रिकेट स्पर्धा व्हायची. त्यासंदर्भातील एका मोसमातील स्पर्धेची माहिती देणाऱ्या पत्रकार परिषदेत मुंबई तसेच भारतीय क्रिकेटमधील नावाजलेले प्रशासक प्राध्यापक रत्नाकर शेट्टी यांनी एक महत्त्वाचा सल्ला पत्रकारांना दिला होता. ते म्हणाले होते, ही शालेय स्पर्धा आहे. येथे उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना त्यांनी केलेल्या कामगिरीची प्रसिद्धी द्यायला हवी; पण ती किती द्यावी हे महत्त्वाचे आहे. तुम्ही त्यांची खास मुलाखती घेता आणि त्या सचिन तेंडुलकरसारख्या महान खेळाडूंच्या वृत्तांएवढ्या या मुलाखती मोठ्या करता. कधी कधी मग या ज्युनियर खेळाडूंना आपण आत्ताच सचिन तेंडुलकर झाल्यासारखे वाटते आणि तिथूनच त्यांच्या प्रगतीची आस कमी होऊ लागते. रत्नाकर शेट्टी यांनी त्या काळीच पुढची पावले ओळखली होती.

असो, आता प्रसिद्धी माध्यमांसह आयीपएलमधून मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी दुधारी तलवारीसारखी आहे. वैभव आणि आयुष या दोघांना आता लाखांमध्ये पैसे मिळाले आहेत. पुढे जाऊन ते कोटींमध्ये होतील, आलीशान गाड्यांमधून फिरण्याची हौस निर्माण होईल. कार्यक्रमांतून चमकण्याची आणि हिरो बनण्याची संधी मिळत राहील; पण आपले ध्येय नेमके काय आहे, हे समजायला हवे. आयुष आणि वैभव ही केवळ दोन उदाहरणे आहेत. त्यांच्यासोबत तयार होणारी नवी पिढी आहे. बीसीसीआयने अशा खेळाडूंच्या प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवायला हवे, एवढेच नव्हे, तर त्यांची सोशल मीडियावरची भ्रमंतीही तपासत राहायला हवी. अर्थात कोणी काय करायचे, हा त्या त्या खेळाडूंचा वैयक्तिक प्रश्न असेल, पण भारतीय क्रिकेटचा वटवृक्ष विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतरही कायम ठेवायचाय हे तेवढेच महत्त्वाचे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.