आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध पंजाब टीम्सच्या मॅचदरम्यान अभिनेत्री प्रिती झिंटा चांगलीच भडकली होती. या मॅचदरम्यान झालेल्या एका मोठ्या चुकीमुळे प्रितीला राग अनावर झाला. दिल्ली कॅपिटल्सकडून 6 विकेट्सने झालेल्या पराभवानंतर पंजाब किंग्जची सहमालक प्रिती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. प्रितीच्या या रागामाचं कारण पंजाब किंग्जचा झालेला पराभव नसून तर तिच्या टीमच्या डावाच्या 15 व्या षटकात घडलेली एक घटना आहे. दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज मोहित शर्माने टाकलेल्या या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पंजाबचा फलंदाज शशांक सिंगने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू शशांकच्या बॅटला लागला आणि तो षटकारासाठी सीमारेषेवरून जात असल्याचं दिसून आलं. परंतु सीमारेषेवर उभ्या असलेल्या करुण नायरने चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला. करूण नायर त्यात बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचं दिसून आलं. पण जेव्हा त्याने चेंडू अडवला, तेव्हा त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला.
आता करुण नायरच्या मते तो एक षटकार होता. पण तरीही हे प्रकरण तिसऱ्या पंचांपर्यंत पोहोचलं आणि खेळात इथेच ट्विस्ट आला. ज्यामुळे प्रिती झिंटा चांगलीच संतापली होती. झालं असं की, चेंडू थांबवणाऱ्या करुण नायरने स्वत: जिथे षटकार म्हटलं, तिथे तिसऱ्या पंचांनी मात्र ते नाकारलं. त्यामुळे पंजाब किंग्सना सहा धावा मिळण्याऐवजी एकच धाव मिळाली. पंजाब किंग्जवर झालेल्या या अन्यायाबद्दल सामन्यानंतर प्रिती भडकली. तिने तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. ही मोठी चूक असल्याचं तिने पुराव्यासह सांगितलं. त्याचप्रमाणे आयपीएलमध्ये अशा चुकांना स्थान नसावं, असंही ती म्हणाली.
प्रितीन याबाबत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने म्हटलंय, ‘आयपीएलसारख्या हाय प्रोफाइल स्पर्धेत जिथे इतकी तंत्रज्ञान आहेत, तरीही जर थर्ड अंपायरने अशी चूक केली तर ती गोष्ट असह्य आह. असं घडू नये. सामना संपल्यानंतर मी स्वत: करुण नायरशी बोलली आणि त्यानेही मान्य केलं की ते षटकार होतं.’ अखेर दिल्ली कॅपिटल्सने 3 चेंडू राखत सामना जिंकला. तिसऱ्या पंचाने चूक केली नसती आणि जर पंजाब किंग्जला 6 धावा मिळाल्या असत्या तर कदाचित त्यांचा स्कोअर 211 धावांपर्यंत गेला असता. ज्यामुळे त्यांना जिंकण्याची संधी मिळाली असती. पण तिसऱ्या पंचाच्या त्या एका निर्णयामुळे आता पंजाब किंग्ज टॉप 2 मध्ये येईल की नाही यावर प्रश्न उपस्थित झाला आहे.