नवी मुंबईत साथरोग जनजागृती शिबिर
esakal May 25, 2025 12:45 AM

वाशी, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप, डेंगी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रांतर्गत पावसाळा कालावधीत प्रत्येक आठवड्याला एक दिवस विशेष हिवताप, डेंगी जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. पावसाळा कालावधी लक्षात घेता १६ ते २१ मे या कालावधीत २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत कार्यक्षेत्रातील खासगी वैद्यकीय व्यावसायिक व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सर्व कर्मचाऱ्यांची सभा घेण्यात आली.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सर्व कर्मचाऱ्यांना पावसाळा कालावधीमध्ये सतर्क राहण्याबाबत सूचित करण्यात आले. २२ मे रोजी २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये १० हजार २१ नागरिकांनी भेट दिली असून, ६४७ रक्तनमुने घेण्यात आले आहेत. शिबिरामध्ये अॅनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्ती स्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून, पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्याबरोबरच घराभोवती व घरांतर्गत असणाऱ्या डासांच्या उत्पत्ती स्थानांची माहिती करून देण्यात आली.
-----------------
पाणी साचण्याची ठिकाणे नष्ट करा!
पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे, तसेच आठवड्यातून एक दिवस त्या स्वच्छ करून कोरड्या ठेवणे, भंगार साहित्य व टायर्स नष्ट करणे, छतावरील प्लॅस्टिक शीट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे व ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगण्यात आले. त्याचप्रमाणे घर व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी उकळून पिणे, भाजीपाला स्वच्छ धुवून वापरणे, उघड्यावरचे अन्न खाणे टाळणे याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.