वाशी, ता. २४ (बातमीदार) : भारतीय संविधानच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेने ‘घरोघरी संविधान’ मोहीम सुरू केली आहे. संविधानाचे आपल्या दैनंदिन जगण्यातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘संविधान साक्षर मोहीम’ राबविली जात आहे. पहिल्या टप्प्यात पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना संविधानाची महती, तसेच त्यातील तत्त्वे व मूल्ये यांची माहिती व्हावी, त्या माहितीचा उपयोग त्यांच्या कार्यालयीन कामकाजात व सार्वजनिक जीवनात मूल्यवर्धनासाठी व्हावा यादृष्टीने संविधान परिचय कार्यशाळेची संकल्पना पालिकेने राबविली आहे. संविधान परिचय कार्यशाळा परिमंडळ दोन, तसेच कोपरखैरणे विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या माध्यमातून कोपरखैरणे येथील अण्णासाहेब पाटील सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. या वेळी लेखक व संविधान अभ्यासक सुरेश सावंत आणि मुंबई विद्यापीठाचे प्रा. मृदुल निळे यांनी संविधानातील महत्त्वाच्या कलम, तसेच मूल्य व अधिकारांबाबत मार्गदर्शन केले. परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील प्रयोजन सांगितले.