कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
esakal May 25, 2025 01:45 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीची २९ जून रोजी निवडणूक

कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. बाजार समितीची मतदार यादी १४ मे रोजी अंतिम करण्यात आली. आता २९ जून रोजी १८ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. मतदानाचा कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बाजार समितीचे २,४६६ मतदार आपल्या नव्या समितीचे सदस्य निवडणार आहेत.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची २०२३ मध्ये मुदत संपली होती. त्यानंतर निवडणुकांची प्रतीक्षा मतदारांसह इच्छुकांना होती; मात्र विद्यमान समितीने कोरोनासह ओबीसी आरक्षणामुळे दोन ते तीन वेळा मुदतवाढ घेतली होती. यानंतरदेखील मुदतवाढ मिळावी यासाठी समितीचे प्रयत्न सुरू होते. या समितीने अनेक वादग्रस्त निर्णय घेतल्याचा सदस्यांचा आरोप आहे. यामुळेच या समितीला मुदतवाढ दिली जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर पणन विभागाने समिती बरखास्त करत बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक केली व निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते. प्रशासक किशोर मांडे यांनी मतदार याद्या अंतिम केल्यानंतर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधवर यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.

बाजार समितीवर १८ सदस्य आहेत. यात कृषी व बहुद्देशीय संस्थांच्या ११ जागांसाठी २४२ मतदार मतदान करतील, तर ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठी ३३० मतदार मतदान करणार आहेत. व्यापारी आणि अडते गटातून असलेल्या दोन जागांसाठी १७८३ मतदार आहेत. त्याचवेळी हमाल आणि तोलाई गटातून एका जागेसाठी १२१ मतदार मतदान करतील, या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मतदार आपला सदस्य समितीवर पाठवू शकणार आहेत. यामुळे इच्छुकांनी आपल्या विभागातील मतदारांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

नामनिर्देशन पत्राची छाननी
निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे २६ ते ३० मेपर्यंत भरता येणार आहेत. २ जून रोजी सकाळी ११ वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईल. वैध नामनिर्देशन यादी ३ जून रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, १७ जूनपर्यंत उमेदवारांना माघार घेता येईल. १८ जून रोजी मतदारांना निशाणी वाटप केले जाणार आहे, तर २९ जून रोजी सकाळी ८ पासून मतदान सुरू होईल, तर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू केली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधव यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.