मंगेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २५ : मोठा डामडौल करीत लग्न करायचे. लग्न सोहळ्यात सर्वांना बडेजाव दाखवायचा. अन लग्नानंतर काही दिवसांतच घरात ‘लक्ष्मी’च्या रूपात आलेल्या सुनेचा हुंड्याच्या कारणावरून छळ करायचा. अशा घटना पिंपरी चिंचवड शहर परिसरातही घडत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील दीड वर्षांत विवाहितेच्या छळाच्या घटनांची २७६ घटनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये बहुतांश घटना हुंड्यासाठी झाल्याचेही समोर येते. तर हुंडाबळीच्याही तीन घटनांची नोंद झाली आहे. तब्बल २९ विवाहितांनी वेगवेगळ्या कारणांवरून आत्महत्याही केल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी सामाजिक प्रबोधनाची गरज आहे.
वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. हुंडा घेणे कायद्यात बसत नसतानाही आजही लग्नात हुंडा घेतला जात आहे. लग्नात घेतला जाणारा हुंडा व हुंडा न दिल्याने विवाहितेचा होणार छळ याबाबी शहरासह परिसरात आजही घडत असल्याचे भीषण वास्तव समोर येते.
समुपदेशिका वंदना मांढरे म्हणाल्या, ‘‘तुमच्या घरात, समाजात, नातेवाईक, मित्रांमध्ये कोणतेही असे नाते असेल जिथे सन्मान हरवत चाललाय. धाक, भीती दाखवून बळजबरीने किंवा नात्याचा वापर करून हसत, टोमणे मारून भेटवस्तू मागितल्या जात आहेत. तिथे आवाज उठवा. हुंड्याच्या प्रथेला विरोध करा. मुलींना, त्यांच्या आत्मसन्मानाला साथ द्या. प्रेमभावना व हुंड्याचा हव्यास यांचा परिणाम मनावर नक्कीच वेगवेगळा जाणवतो. तो वेळीच ओळखा.’’
महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोलिस ठाण्यात तसेच आयुक्तालयातही महिला सहायता कक्ष आहे. महिलांना काहीही त्रास होत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दाखल घेऊन त्यांना पूर्ण सहकार्य केले जाते.
- संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड
हुंडाबळी, महिला अत्याचार संदर्भातील गुन्ह्यात जे कोणी सहभागी असतील; त्या सर्वांनाच आरोपी करणे गरजेचे आहे. केवळ ‘एफआयआर’ झाल्यानंतरही त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून तपास करणे आवश्यक आहे. कायद्याची योग्य अंमलबजावणी झाल्यास पीडित व्यक्तीला न्याय मिळेल.
- ॲड. असीम सरोदे, ज्येष्ठ विधिज्ञ
परिणाम अन् उपाय...
- हुंडाबळी, महिलांचा मानसिक, शारीरिक छळ विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी
- चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भव्य विवाह, हुंडाप्रथा दाखविण्यास मनाई
- आर्थिक कुवतीपेक्षा जास्त खर्च, प्रेमभावनेपेक्षा प्रतिष्ठेचा प्रश्न केल्यामुळे विपरीत परिणाम
- शाळा, महाविद्यालयांतून हुंडा प्रथेविरोधात जागृती
- मुला-मुलींना नातेसंबंधात समता, एकमेकांचा आत्मसन्मान करण्याबाबत प्रबोधन
हुंडा ही केवळ एक चुकीची परंपरा नाही; तर ती मुलींच्या स्वाभिमानावर गदा आणणारी एक सामाजिक कीड आहे. एक वडील म्हणून मी आज समाजासमोर उभा आहे. हुंडा नाही, समानता हवी. मान-सन्मानाने नातं जोडू या, व्यवहाराने नाही. जर आपण आपल्या मुलीला सक्षम आणि स्वाभिमानी बनवत असू; तर आपणच आधी तिच्या सन्मानाचे रक्षण करायला हवे. माझी ही छोटी कृती इतर वडिलांसाठी एक प्रेरणा ठरो, हीच माझी अपेक्षा आहे.
- अनंत पगार, पालक
लग्न जमविण्यापूर्वी आपल्याकडे मुला व मुलीची जशी पत्रिका पाहिली जाते. त्याबरोबर इतर गोष्टींकडे पण लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. भावी वधू- वरांनी एकत्र बसून आपल्या अपेक्षा नीटपणे समोरील व्यक्तीला समजावून सांगितल्या पाहिजेत. आपल्या आयुष्यात घडलेल्या जशी जमेची बाजू आपण मांडतो. तशीच दुसरी बाजू पण उघड केली पाहिजे. त्यासाठी काही अडचणी येत असतील;
तर विवाहपूर्व समुपदेशन घेणे जन्मकुंडली बघण्याइतकेच अत्यंत गरजेचे आहे.
- प्रदीप सातपुते, समुपदेशक
मागील दीड वर्षातील विवाहिता छळाच्या घटना
वर्ष
२०२४ - २०४
२०२५ एप्रिल - ७२
----------------------
हुंडाबळीच्या घटना
२०२४ - ०३
२०२५ एप्रिल- ००
-------------------------
महिला आत्महत्येच्या घटना
२०२४ - २१
२०२५ एप्रिल - ८