शिवडीच्या टीबी रुग्णालयाला अतिदक्षता डॉक्टर मिळेना!
पालिकेकडून चौथ्यांदा जाहिरात काढण्याची तयारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबई महापालिकेच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी अतिदक्षता डॉक्टर (इन्टेन्सिव्हिस्ट डॉक्टर्स) उपलब्ध होत नसल्याने पालिका प्रशासन अडचणीत आले आहे. या पदांसाठी तीनवेळा जाहिरात दिली असूनही डॉक्टर स्वारस्य दाखवत नसल्यामुळे आता चौथ्यांदा जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू आहे. या पदांसाठी पालिका प्रशासनाने १.२५ लाख ते दोन लाख रुपये मासिक मानधन देण्याची तयारी दाखवली आहे.
शिवडीतील रुग्णालयात १० खाटांचे आयआरसीयू यूनिट कार्यरत आहे. येथे रुग्णांच्या गंभीर अवस्थेवर उपचार करण्यासाठी अतिदक्षता डॉक्टरांची आवश्यकता आहे. सध्या केवळ एकच डॉक्टर कार्यरत आहे, तर वेळोवेळी सर्जरी नसलेल्या कालावधीत भूलतज्ज्ञांकडून ही जबाबदारी पार पाडली जात आहे. प्रशासनाने सांगितले की, रुग्णसेवेमध्ये कोणतीही अडथळा येऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.
डॉक्टरांचा नकार कशामुळे?
या रुग्णालयाशी संबंधित एका वरिष्ठ डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, टीबी रुग्णालयातील कामकाजामुळे संसर्गाचा धोका अधिक असल्याने अनेक डॉक्टर या पदांसाठी अर्ज करण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा आजारांशी संबंधित उपचार केंद्रात काम करणे ही एक धोकादायक जबाबदारी असल्याने डॉक्टर पुढाकार घेत नाहीत.
उपनगरांतील रुग्णालयांसाठीही प्रतिसाद नाही
शिवडीप्रमाणेच उपनगरांतील रुग्णालयांसाठीही डॉक्टर मिळवण्यात पालिकेला अपयश येत आहे. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, स्नातकोत्तर वैद्यकीय अधिकारी अशा अनेक पदांसाठी पुन्हा जाहिरात काढण्यात आली आहे. उपनगरांतील रुग्णालयांत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाचे ५६, स्नातकोत्तर वैद्यकीय अधिकारी दोन, सामान्य औषध दोन, सूक्ष्मजीवशास्त्र दोन, क्ष-किरणशास्त्र विभागातील सर्व पाच पदे रिक्त आहेत.
या पदांसाठी मिळाला कमी प्रतिसाद-
याआधी पालिकेने करार तत्त्वावर ८३ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, ४३ स्नातकोत्तर वैद्यकीय अधिकारी, १२ प्रसूती व स्त्रीरोग विभाग, आठ सामान्य शस्त्रक्रिया, आठ बालरोग, सात सामान्य औषध, पाच क्ष-किरणशास्त्र, तीन स्नातकोत्तर वैद्यकीय अधिकारी, दोन सूक्ष्मजीवशास्त्र, दोन पॅथॉलॉजी आणि एक ऑर्थोपेडिक पदासाठी जाहिरात दिली होती, मात्र या सर्व पदांसाठी अत्यल्प प्रतिसाद मिळाला.