तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक खरेदी करायची आहे का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, ओलाची बाईक आली आहे. ओला बाईक फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आली होती. आता या बाईकची डिलिव्हरी सुरु झाली आहे. या बाईकचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया.
ओला इलेक्ट्रिकने आपली पहिली इलेक्ट्रिक मोटारसायकल रोडस्टर एक्सची डिलिव्हरी 23 मेपासून भारतीय बाजारपेठेत सुरू केली आहे. रोडस्टर एक्सची निर्मिती ओला इलेक्ट्रिकच्या फ्युचर फॅक्टरीमध्ये केली जात असून इच्छुक ग्राहक ओला डीलरशिपवर जाऊन इलेक्ट्रिक मोटारसायकल पाहू शकतात.
ओला रोडस्टर एक्स फेब्रुवारी 2025 मध्ये भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. त्यावेळी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओलाने ईव्हीसाठी बुकिंग सुरू झाल्याची घोषणा केली होती आणि लवकरच डिलिव्हरी सुरू करण्याची योजना आखली होती. मात्र, काही कारणास्तव उशीर झाला. 2 वेळा तारीख पुढे ढकलल्यानंतर अखेर ओलाने बाईकची डिलिव्हरी सुरू केली आहे.
ओला बाइक डिलिव्हरी
ओलाच्या रोडस्टर एक्सची डिलिव्हरी टप्प्याटप्प्याने ब्रँडच्या इलेक्ट्रिक स्कूटरपासून वेगळी करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही बाईक बेंगळुरूमधील ग्राहकांना उपलब्ध होणार असून, त्यानंतर ती देशातील इतर भागातील ग्राहकांना पाठवण्यात येणार आहे. असे केल्याने कंपनीला सुरुवातीच्या बॅचमध्ये येणाऱ्या संभाव्य समस्या सोडविण्याची संधी मिळेल.
ओला बाईक स्पीड आणि रेंज
ओला रोडस्टर एक्स आणि एक्स + या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. एक्स मॉडेल तीन बॅटरी पॅक पर्यायांसह येते. 2.5 किलोवॉट, 3.5 किलोवॉट आणि 4.5 किलोवॉट पर्याय आहेत. ही बाईक केवळ 3.1 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते. याशिवाय सर्वात मोठा बॅटरी पॅक एकदा चार्ज केल्यावर 252 किमीपर्यंत धावू शकतो.
ओला बाईकची किंमत
ओला रोडस्टर एक्स ही इलेक्ट्रिक स्ट्रीट बाईक आहे, जी 3 व्हेरियंट आणि 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे. ओला रोडस्टर एक्समध्ये फ्रंट आणि रिअर या दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक देण्यात आले असून यात दोन्ही चाकांची कॉम्बी ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे. ओला रोडस्टर एक्स व्हेरियंट रोडस्टर एक्स 2.5 किलोवॅटची किंमत 1,15,936 रुपयांपासून सुरू होते. रोडस्टर एक्स 3.5 किलोवॅट आणि रोडस्टर एक्स 4.5 किलोवॅट च्या इतर व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 1,26,227 रुपये आणि 1,41,517 रुपये आहे. रोडस्टर एक्सची ही किंमत दिल्लीतील ऑन-रोड किंमत आहे.